संमेलनाध्यक्ष निधीतून वाङ्मयीन उपक्रम ; महाराष्ट्र साहित्य परिषदेचा निर्णय

संमेलनाध्यक्ष निधीतून वाङ्मयीन उपक्रम ; महाराष्ट्र साहित्य परिषदेचा निर्णय
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उद्देश साध्य होत नसल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा एक लाख रुपयांचा निधी अन्य वाङ्मयीन उपक्रमांसाठी वापरण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही माहिती दिली. 2010 मध्ये पुण्यात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फाउंडेशनने 83 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुपूर्त केला. त्याच्या व्याजातून समीक्षा संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, शाखा मेळावा हे उपक्रम राबविण्यासह साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लाख रुपयांचा निधी हा ग्रामीण आणि दुर्गम भागातील विविध वाङ्मयीन उपक्रमांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरवर्षी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हा निधी संमेलनाध्यक्षांना देण्यात येत होता. ग्रामीण आणि दुर्गम भागातील वाङ्मयीन चळवळींना बळ देण्यासाठी तसेच तिथल्या साहित्य संस्था व ग्रंथालये यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना मानधन, प्रवास-निवासाच्या खर्चाचा भार तेथील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणार्‍या संस्था आणि संयोजकांवर पडू नये, हा निधी देण्यामागचा उद्देश होता. तो साध्य होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे प्रा. जोशी यांनी सांगितले. या निधीचा हिशेब देणे संमेलनाध्यक्षांकडून अपेक्षित नाही. मात्र, झालेल्या उपक्रमांविषयीची माहितीही दिली जात नाही, अशी खंत प्रा. जोशी यांनी व्यक्त केली. डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अरुणा ढेरे यांचा अपवाद वगळता यासंदर्भात संमेलनाध्यक्षांची उदासीनताच दिसून आली. ज्या उद्देशासाठी हा निधी दिला जात होता तो साध्य होत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे प्रा. जोशी आणि डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले. या निधीचा विनियोग कोणत्या वाङ्मयीन उपक्रमांसाठी खर्च करायचा, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जयंत नारळीकर यांच्याकडून निधी परत
कोरोनाच्या संकटकाळात कार्यक्रमांवर असलेल्या बंधनांमुळे तसेच प्रकृतिअस्वास्थ्यामुळे प्रवास करून कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी एक लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे परत केला होता, असे प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. ग्रामीण भागातील संस्थांना ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगून त्या कार्यक्रमांना डॉ. नारळीकर उपस्थित राहिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news