अवकाळीने शहराला आणली अवकळा !

अवकाळीने शहराला आणली अवकळा !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात हलका पाऊस, दाट धुके अन् गार वार्‍यांनी मंगळवारी पुणेकरांची दाणादाण उडाली. सर्वच रस्त्यांवर पावसाने चिखल तयार झाला होता. रामेश्वर चौकात दुचाकी घसरून मोठ्या डंपरखाली आल्याने शुभम डोके (वय 21, रा. हडपसर) या तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सकाळी 9च्या दरम्यान घडली. विविध भागांत अनेक नागरिक घसरून पडल्याच्या घटना घडल्या. हडपसर भागात 13 मिमी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 23 जानेवारी 1948 नंतरचा हा जानेवारी महिन्यातील तिसरा मोठा पाऊस ठरला.

मंगळवारी 9 जानेवारी रोजी सकाळी 7 पासून आभाळ भरुन आले, त्यामुळे सकाळी 7 पर्यंत शहरात गडद अंधार होता. त्याच सुमारास टपोरे थेंंब सुरु झाले. मात्र सकाळी 7.30 वाजता पवासच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. पुन्हा 8 ते 8.30 दरम्यान पाऊस थांबला. मात्र ढगाळ वातावरणाचा अंदाज घेऊन पुणेकरांनी स्वेटर, टोपी, मफलरसह रेनकोट घेऊनच बाहेर पडण्यास सुरुवात केली. पावसाने सकाळीच जोर धरल्याने सर्वच रस्त्यांवर चिखल तयार झाला. मंडई परिसराजवळील रामेश्वर चौकातून हडपसर येथूून अवघ्या 21 वर्षाचा शुभम डोके हा आपल्या दुचाकीवरुन जात होता. याच ठिकाणी चिखलामुळे त्याची दुचाकी घसरली ती थेट भल्या मोठ्या डंपरच्या मागच्या चाकाखाली जाताच त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. जागीच त्याचा प्राण गेला. रस्त्यावर रक्ताचा सडाच पडल्याने तेथे नेमके काय झाले हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली. लोकांनी फरासखाना पोलिसांना ही वर्दी दिली. पोलिस आले आणि त्यांनी घटनास्थळाचा ताबा त्यांनी घेतला. या घटनेने प्रत्येक जण हळहळतच तेथून पुढे जात होता.

दिवसभर रिमझिम, दाट धुके अन् गार वारे
मंगळवारी सकाळी 9 पासून मात्र कुठे रिमझिम तर काही भागात मध्यम सरी पडण्यास सुरुवात झाली. रस्ते चिंब झाले. त्यानंतर रस्त्यांवरील सखल भागात छोटी छोटी डबकी तयार झाली. शहराला चहुबाजूंनी दाट धुक्याने घेरले होते. ते खूप खाली आल्याने द़ृष्यमानता कमी झाली होती. दिवसभर पाऊस, थंडी अन् दाट धुक्याने हैराण झालेल्या पुणेकरांची चहाच्या टपरीवर गर्दी पाहावयास मिळाली, तर घराघरांत शेगडीत शेकोट्या पेटवून ज्येष्ठ नागरिक ऊब घेत होते.

अनेक जण घसरून पडले
सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत शहरासह उपनगरात पाऊस सुरूच होता. पावसाचा जोर जास्त नसल्याने रस्त्यावरच्या धुळीचे चिखलात रूपांतर झाल्याने शहराच्या विविध भागांत नागरिक दुचाकीवरून घसरून पडल्याच्या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

1948 मध्ये झाला होता 32 मिमी पाऊस
शहरातील जानेवारी
महिन्यातील पावसाची सरासरी
ही शून्य टक्के आहे. मात्र,
आजवर खूप कमी वेळा

जानेवारीत मोठा पाऊस झाला आहे. प्रामुख्याने 73 वर्षांपूर्वी 24 जानेवारी 1948 रोजी शहरात 32.5 मिमी पाऊस झाला होता. शहरात असे वातावरण आगामी 48 तास राहणार आहे. 11 जानेवारीपर्यंत पाऊस निवळून 12 रोजी कोरडे वातावरण राहील. त्यानंतर मात्र किमान तापमानात घट होईल. मात्र, ही घट फार होणार नाही. पारा 12 ते 13 अंशावर स्थिर राहिल. 16 जानेवारीनंतर मात्र कमाल व किमान तापमानात वाढ दिसण्याची शक्यता आहे.
                              – अनुपम कश्यपी, हवामान विभागप्रमुख, पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news