वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणात पाणी पिताना हरणावर अचानक पाच ते सहा मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून जखमी केले. त्या वेळी स्थानिक युवकांनी प्रसंगावधान दाखवत कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका केली. वन विभागाने रेस्क्यू पथकाच्या मदतीने हरणाला उपचारांसाठी दाखल केले. कुडजे (ता. हवेली) येथे मंगळवारी (दि. 18) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) संरक्षक भिंत ओलांडून हरीण पाणी पिण्यासाठी धरणावर आले होते. त्या वेळी मोकाट कुत्र्यांनी हरणावर हल्ला केला. हरीण मोठमोठ्याने ओरडत होते.
त्याचा आवाज ऐकून स्थानिक युवक संकेत सोनवणे, विठ्ठल उमाटे, परमेश्वर उमाटे, आर्यन अविनाश पायगुडे, विश्वतेज जगताप, विष्णू कोंडरवाड यांनी तीरावर धाव घेतली. त्यांनी कुत्र्यांवर दगडांचा मारा करीत हरणाची सुटका केली. मान, पोट व पायांना कुत्र्यांनी जोरदार चावा घेतल्याने हरीण गंभीर जखमी झाले. पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर खडकवासला विभागाच्या वनरक्षक सुनीता कुचगावे, भूगाव येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. रेस्क्यू पथकाच्या नरेश चांडक, सायली पिलाणे, एजाज शेख, तयाब सय्यद यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर हरणाला उपचारांसाठी भूगाव येथील केंद्रात दाखल केले.
पाणवठे करण्याची गरज
एनडीएच्या जंगलात तसेच खडकवासला धरण खोर्यात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. उन्हाळ्यात वणवे लागत असल्याने जंगलात चारा, पाणी मिळत नाही. त्यामुळे ससे, हरीण असे प्राणी खाद्य, पाण्यासाठी धरणावर येतात. या वेळी मोकाट कुत्री त्यांची शिकार करीत असल्याचे प्रकार दरवर्षी घडतात. एनडीए प्रशासनाने सीमा भिंतीच्या आत वन्यप्राण्यांसाठी पाणवठे करावेत तसेच वन विभागाने अधिवास क्षेत्रात नैसर्गिक पाणवठ्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.