प्रेयसीला त्रास देणाऱ्या कामगाराचा खून करणार्‍याला जन्मठेप..!

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रेयसीला मोबाईलवरून संपर्क करत सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून कंपनीतील कामगाराच्या पोटात चाकू खुपसून खून करणार्‍या सुपरवायझरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संतोष शहाजी राठोड (वय 26, मूळ रा. शिंगोली (तांडा), जि. उस्मानाबाद) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जन्मठेपेसह राठोड याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी निकालात नमूद केले आहे.
दामोदर कृष्णा जबल (रा. धारावी, मुंबई) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी कंपनीतील लेबर कॉण्ट्रॅक्टर अमित जाधव यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 20 ऑगस्ट 2018 रोजी शिरूर तालुक्यातील सणसवाडीमध्ये ही घटना घडली होती. जबल व राठोड हे येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. या ठिकाणी जबल हा कामगार तर राठोड हा सुपरवायझर म्हणून काम करत होता. कंपनीतील एका तरुणीशी राठोड याचे प्रेमप्रकरण सुरू होते. या वेळी जबल हा तरुणीच्या मोबाईलवर मिस्डकॉल देत होता. तरुणीने कॉल केल्यानंतर कोणी रिप्लाय देत नसल्याने तरुणीने सांगितले. या वेळी राठोड याने प्रेयसीकडून संबंधित नंबर घेत संपर्क केला. प्रेयसीला सतत कॉल करीत त्रास देत असल्याच्या कारणावरून 18 ऑगस्ट रात्री साडेबाराच्या सुमारास दोघांमध्ये भांडणे झाली.

भांडणावेळी जबर मारहाण झाल्याने जबल याला दवाखान्यात नेण्यात आले. घटनेच्या दोन दिवसांनंतर राठोड याला जबल कंपनीच्या प्रवेशद्वारावर दिसला, त्यानंतर त्याने त्याच्याकडे असलेल्या चाकूने त्याच्या पोटात वार केले. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणात राठोड याला अटक करीत त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर व सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. त्यांनी पंधरा साक्षीदार तपासले. या वेळी आरोपीची प्रेयसी व प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणात तत्कालीन शिक्रापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी तपासी अंमलदार म्हणून काम पाहिले.

प्रेयसीच्या साक्षीमुळे मारण्याचा हेतू सिद्ध

प्रेयसीला न्यायालयात हजर केले असता जबल मोबाईलवरून संपर्क करून सातत्याने त्रास देत होता. त्या कारणावरून यापूर्वी राठोड व जबल यांच्यामध्ये वाद झाले होते. जबलचा खून केल्यानंतर राठोड याने प्रेयसीशी संपर्क केला. दामोदरला चाकूने वार करीत त्याच्या आतड्या बाहेर आल्या आहेत. माझा मोबाईल नंबर डिलीट कर व माझी छायाचित्रेही काढून टाक. मला फोन करू नको, असे सांगितले. त्या वेळी हा मोटारसायकलवरून कोठेतरी चालला आहे, हे फोनवरून समजल्याची साक्ष प्रेयसीने न्यायालयाला दिली. त्यानंतर जबलच्या खुनाचे कारण स्पष्ट झाले.

प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष ठरली महत्त्वाची

कंपनी परिसरात साक्षीदार महिलेचे किराणा दुकान आहे. त्यामुळे ती जबल व राठोड या दोघांना ओळखत होती. घटनेच्या दिवशी ती भाजी आणण्यासाठी चालली होती. या वेळी राठोड हा जबल याचा पोटात चाकू खुपसून खून करीत असल्याचे तिने पाहिले. परिणामी, तिला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर करण्यात आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news