नवी सांगवी : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नवी सांगवी : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नवी सांगवी(पुणे) : पावसामुळे सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्याकडेला असणार्‍या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पिंपळे गुरव येथील गजानन नगरमध्ये अंतर्गत रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने ये-जा करण्यासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे चाकरमानी, शालेय विद्यार्थी यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.

वाहतुकीस अडथळा

सांगवी, पिंपळे गुरव परिसरात तसेच येथील परिसरात शाळा, कॉलेज, कार्यालये, बँका असल्याने विद्यार्थी, चाकरमानी यांची पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे धांदल उडाली होती. या वेळी घराबाहेर पडताच अंतर्गत रस्त्यावर, मुख्य रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून पडले होते. त्यामुळे शालेय वाहतुकीस, दुचाकी, चारचाकी वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना, चाकरमानी यांना शाळेत, कार्यालयात पोहोचण्यासाठी विलंब झाला. या वेळी उद्यान विभागाला माहिती मिळताच उद्यान विभागाचे कर्मचारी काही वेळातच दाखल होऊन रस्त्यावरील फांद्या छाटून रस्ता सुरळीत करून देण्यात आला.

उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

गेली काही दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर अचानक पहाटे पासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांना अडगळीत टाकून दिलेले रेनकोट, जर्किन, हेल्मेट, छत्र्या बाहेर काढून घराबाहेर पडावे लागत होते. गेली तीन ते चार दिवसांपासून उखाड्याने हैराण केल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने थोडासा का होईना दिलासा मिळाला.

रस्त्यावर पाणीच पाणी

पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले. दूध, भाजीपाला, पेपर यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी विलंब होत होता. नियमित व्यायाम करणारे मुसळधार पावसामुळे घराबाहेर पडू शकले नाहीत. परिसरात मुसळधार पाऊस इतका होता की रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला अक्षरशः पाणीच पाणी वाहत असल्याचे दिसून येत होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news