पुणे : ग्रंथालयांना चणचणच! महिनाभराचा खर्च करणेही अवघड

पुणे : ग्रंथालयांना चणचणच! महिनाभराचा खर्च करणेही अवघड
Published on
Updated on

सुवर्णा चव्हाण

पुणे : कोरोनामुळे दोन वर्षे शहरातील ग्रंथालये आर्थिक अडचणीत सापडली होती. अजूनही ग्रंथालये आर्थिक अडचणीत असून, ग्रंथालयांना महिन्याचा व्यवस्थापनाचा खर्च करण्यासह नवीन पुस्तक खरेदी करणेही अडचणीचे जात आहे. अनुदान जरी वेळेत मिळत असले तरी अनुदानातून नव्या पुस्तक खरेदीसह ग्रंथालयांचा संपूर्ण खर्च करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून, पुस्तकाच्या वाढत्या किमती, वाढलेल्या कागदाच्या किमती, वाढलेले वीजबिल अन् वाढलेल्या इतर खर्चामुळे ग्रंथालय व्यवस्थापनावर खर्चाचा बोजा वाढला आहे.

वाचनचळवळीला भक्कम करणारी अनेक ग्रंथालये पुण्यात आहेत. त्यात सरकारी अनुदानित ग्रंथालयांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यातून ग्रंथालये अजूनही सावरलेली नाहीत. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एका कार्यक्रमात अनुदान वाढविण्याविषयी भाष्य केले होते. त्यानुसार अनुदानात वाढ करून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी केली जात आहे.

याविषयी पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे म्हणाले, 'सध्या ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाचा खर्च वाढला आहे. ग्रंथालयांना स्वत:च हा खर्च पेलावा लागत आहे. तो करणेही ग्रंथालयांना कठीण जात आहे. आता सर्व काही सुरळीत झाले असतानाही ग्रंथालयाची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. नवीन पुस्तक खरेदी करीत असलो, तरी त्याचे प्रमाण कमीच आहे. दरवर्षी 8 ते 10 लाख रुपयांची नवीन पुस्तके आम्ही खरेदी करतो. परंतु, त्याच्यात घट झाली आहे. पुस्तक खरेदीचे प्रमाण 15 ते 20 टक्केच आहे.

कर्मचार्‍यांचे वेतन, वीजबिल, ग्रंथालय व्यवस्थापनाचा खर्च करणेही आत्ताच्या घडीला कठीण बनले आहे. देणग्या, वर्गणी आणि इतर निधीतून हा खर्च केला जात असला, तरी तो पुरेसा नाही. ग्रंथालयाचा खर्च महिन्याला तीन लाख रुपये आहे. त्यातुलनेत शासनाकडून मिळणारे अनुदान थोडके आहे. अनुदानात ग्रंथालयाचा खर्च निघत नाही. अनुदान वाढविल्याशिवाय ग्रंथालये सशक्त होणार नाहीत.

राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालयाचे मानद सचिव राजेंद्र सुतार म्हणाले, "सध्या ग्रंथालयांतील वाचकसंख्याही घटली असून देणगी, वर्गणी आणि इतर निधींची संख्या कमी झाली आहे. ग्रंथालयाचा महिन्याचा व्यवस्थापनाचा खर्च करणे अवघड बनले आहे. वाढत्या महागाईमुळे तर अडचणींमध्ये वाढ झाली आहे. नवीन पुस्तक खरेदी केली असली, तरी ग्रंथालय व्यवस्थापनाचा खर्च करणे कठीण होत आहे.

वाढलेल्या महागाईमुळे ग्रंथालयांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे ग्रंथालयांवर खर्चाचा बोजा वाढला असून, तो करणे कठीण जात आहे. अनुदानवाढीविषयी बोलले जात असले तरी ते कधी होईल माहीत नाही. अनुदानवाढीबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा.

                                               – दिलीप भिकुले, ग्रंथपाल, सिद्धार्थ वाचनालय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news