म्हणे, कैद्यांचा अहवाल न्यायालयातच सादर करू; विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ससूनचा हरताळ

म्हणे, कैद्यांचा अहवाल न्यायालयातच सादर करू; विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ससूनचा हरताळ
पुणे; पुढारी वृत्तसेवा : विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कैद्यांच्या माहितीचा अहवाल 24 तासांच्या आत सादर करण्याचे आदेश ससून प्रशासनाला शुक्रवारी दिले होते. मात्र, कैद्यांचा अहवाल गोपनीय असून, केवळ न्यायालयात सादर करू, असे ससून प्रशासनाने स्पष्ट केले. दुसरीकडे, दबाव निर्माण होताच चार कैद्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आल्याने ससून प्रशासनाची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आली आहे.
ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील आरोपी ललित पाटील ससूनमधून गेल्या सोमवारी पळून गेला. त्यानंतर ससूनमध्ये    कैद्यांना महिनोनमहिने आश्रय दिला जात असल्याची माहिती पुढे आली. शुक्रवारी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्ड क्रमांक 16 येथे भेट दिली. त्यानंतर कैद्यांच्या माहितीचा अहवाल डॉ. संजीव ठाकूर यांनी विशेष समितीमार्फत 24 तासांच्या आत सादर करावा, असे आदेश दिले होते.
आदेशाची सोमवारी रात्रीपर्यंत अंमलबजावणी झाली नव्हती. ससून प्रशासनाने कैद्यांच्या अहवालाऐवजी विभागीय आयुक्त कार्यालयाला औषध साठा, मनुष्यबळ आदी माहितीचा अहवाल सादर केला. याबाबत विचारणा केली असता, कैद्यांची माहिती पूर्णपणे गोपनीय असून ती केवळ न्यायालयाला सादर केली जाईल, असे सांगण्यात आले.

गोपनीयतेचे गूढ

ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये किती कैदी आहेत, कधीपासून अ‍ॅडमिट आहेत, त्यांना काय आजार आहेत आणि डिस्चार्ज कधी देणे अपेक्षित आहे, या माहितीचा अहवाल तयार करण्यासाठी तीन डॉक्टरांची विशेष समिती तयार करण्यात आली. समितीने तातडीने बैठक घेऊन कार्यवाहीला सुरुवात केल्याचे शनिवारी सांगण्यात आले. मात्र, अहवालाबाबत इतकी गोपनीयता कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मी आणि जिल्हाधिकारी यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला. त्यादिवशी ससूनमधील कैद्यांच्या कक्षात 9 कैदी होते. ससून रुग्णालयाने कळविलेल्या माहितीनुसार या सर्व कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानुसार अहवाल तयार करण्यात आला आहे. चार कैदी वगळून इतरांना पुन्हा कारागृहात पाठवून देण्यात आले आहे. ससून रुग्णालयाने अद्याप विभागीय आयुक्तालयाला याबाबतचा लेखी अहवाल पाठविलेला नाही. हा अहवाल पाठवून देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
– सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news