

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दाभाडे मळा परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, रात्री एकाचवेळी पाच बिबट कळपाने फिरत असताना दिसून आले. हेच कमी की काय, तर मंगळवारी (दि. 2) भरदिवसा दुपारी साडेतीन वाजता बिबट्याने चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील शेळीवर झडप टाकून हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेळीचा मृत्यू झाला. बिबट्याचा असा धुमाकूळ सुरू असूनही वन विभागाकडून पिंजरा लावला जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
पिंपरखेड येथील दाभाडेमळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ला करीत आहे. मंगळवारी गावडेमळा येथील हनुमान मंदिर परिसरातील ओढ्यालगत गजानन महादू कोकणे यांचा मेंढ्यांचा कळप चरत होता. या वेळी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कळपावर हल्ला चढवत एका शेळीला ओढत नेले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेळीचा मृत्यू झाला.
सोमवारी (दि. 1) रात्री साडेसातच्या सुमारास पिंपरखेड-भागडी रस्त्यावर रामहरी काशिनाथ दाभाडे यांना दोन बिबटे आडवे गेले. त्यानंतर त्याच ठिकाणी आठ वाजता बापू रामभाऊ दाभाडे हे घरी जात असताना रस्त्यावर दोन पूर्णपणे मोठे व तीन लहान, असे पाच बिबटे त्यांना निदर्शनास आले. एकाचवेळी पाच बिबटे दिसल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. या वेळी तीन बिबटे रस्त्याच्या पूर्वेला निघून गेले. मात्र, दोन बिबट त्याच ठिकाणी ऊसशेतात बसले. त्याच दिवशी तुषार दाभाडे यांच्या घरासमोर रात्री नऊ वाजता बिबट्या आला होता. भक्ष्याच्या शोधात बिबट्या बाहेर पडून थेट दारात येत असल्याने नागरिक जीव मुठीत धरून बाहेर पडत आहेत.
वन विभागाकडून कोणतीही दखल नाही
शेतात घरे असल्याने लपण क्षेत्र असलेल्या ठिकाणी बिबट्या दबा धरून बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर पडणे धोकादायक ठरत असून, वन विभागाचे अधिकारी घटना घडूनही या भागात फिरकत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.
हेही वाचा :