खेडचे आमदार मोहिते पाटील यांच्या कॉलनीत बिबट्यांचा वावर

खेडचे आमदार मोहिते पाटील यांच्या कॉलनीत बिबट्यांचा वावर

राजगुरूनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील राहत असलेल्या राजगुरूनगरच्या वाडा रोड परिसरात मंगळवारी (दि ८) पहाटे बिबट्याने धुमाकुळ घातला. शहरालगतच्या सातकरस्थळ ग्रामपंचायत हद्दीतील वाडा रस्त्यावरील बालाजी नगर परिसरात श्रीमान सोसायटीत राजगुरूनगर न्यायालयाचे सरकारी वकील अँड. गिरीष कोबल राहतात, त्यांच्या घराच्या अंगणात पहाटे दोन वाजता सात मिनिटे बिबटया थांबुन होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुळात या परीसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरीक भयभीत आहेत. अनेकांना बिबटयाचे दर्शन झाल्यावर वनविभागाने किवणे मळा परीसरात आठ दिवसांपूर्वी पिंजरा लावुन ठेवला आहे. बिबट्याने मात्र तिकडे न फिरकता विरुध्द बाजुच्या कॉलनीत मोर्चा वळवल्याचे समोर आले आहे. मागील आठवडयात शेतकरी दत्तोबा सातकर यांना बिबटया समोर गेला होता. भीतीचे वातावरण असताना ही घटना समोर आल्याने येथील रहिवासी, शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे.

सरकारी वकील अँड गिरीष कोबल यांच्या घराच्या व्हरांड्यात मंगळवारी पहाटे दोन वाजता बिबटया आला. साडेचार फुटांची भिंत आणि त्यावर दीड फुटांचे लोखंडी पाईप असतानाही त्यावरून बिबट्याने अंगणात उडी मारत प्रवेश केला. यात बिबट्याचा सहा मिनिटांचा वेळ गेला. त्यानंतर बिबट्याने अंगणात असलेल्या कुत्र्याला जबड्यात पकडले. पण कुत्र्याच्या गळयात कातडी पट्टा असल्याने बिबट्याला घट्ट पकड करता आली नाही. कुत्र्याने जिवाच्या आकांताने ओरडत इकडे तिकडे पळापळ केली.

ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यावर अँड. कोबल परिवारासह जागे झाले. त्यांनी आरडाओरड केला. त्याला बिबट्याने दाद दिली नाही. अखेर हाताला लागतील ती भांडी घेऊन कोबल व परिवाराने जोरात वाजवायला सुरुवात केली. तो आवाज ऐकुन बिबट्याने जबड्यात पकडलेल्या कुत्र्याला सोडुन देत धुम ठोकली. जवळपास सात मिनिटे बिबटया या ठिकाणी होता. या सर्व घटनेचे सिसीटिव्ही कॅमेरात चित्रीकरण झाले आहे. अँड गिरीष कोबल यांच्या शेजारी वनविभागाचे कर्मचारी किरण मिरजे राहतात. त्यांनी राजगुरूनगर वनविभागाच्या वरीष्ठ अधिकारी वर्गाला याबाबत माहिती दिली व उपाययोजना करण्यासाठी आवाहन केले.

शहर व लगतच्या परिसरात विवीध ठिकाणी बिबटया आढळत आहे. नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाला सुचना केल्यावर पिंजरा लावुन पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आम्ही रहात असलेल्या एका कॉलनीत पिंजरा लावला आहे. विरुद्ध बाजूला असलेल्या ऍड कोबल यांच्या घरी बिबटया आढळला. वनविभागाला गस्त घालण्यासाठी सांगण्यात आले आहे.

– दिलिप मोहिते पाटील, आमदार खेड

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news