

वाडा; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यात 2 जणांना जीव गमवावा लागल्याने बिबट्यांची प्रचंड दहशत माजली आहे. त्यातच आता काही समाजकंटक सोशल मीडियावर बिबट्यांचे जुने फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल करून भर घालत आहेत. त्यामुळे नागरिकांसह वन विभागाची देखील धांदल उडाली असून, संभ्रमावस्था निर्माण होत आहे.
धुवोली येथे अजय चिंतामण जठार (वय 17) या बारावीच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. 17 मार्च रोजी सायंकाळी घडली. यापूर्वी देखील एका नागरिकाचा बिबट्याने बळी घेतला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे.
त्यानंतर बिबट्याच्या अस्तित्वाबाबत अनेक ठिकाणी अफवांना मोठा पेव आला आहे. काही समाजकंटक बिबट्याचे जुने व्हिडीओ, फोटो व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांद्वारे मुद्दाम व्हायरल करीत आहेत. बुरसेवाडी येथे पट्टेरी वाघ दिसल्याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्याची खातरजमा न करता काहींनी तो फोटो व्हायरल केला आहे.
अनेकांनी तर त्याचा धसका घेत वन विभागाला संपर्क साधला. चिखलगाव येथे देखील अशाच प्रकरची अफवा पसरविली गेली होती. त्यामुळे वन विभागाची देखील धावपळ होत आहे. ही घटना परराज्यातील असून, फक्त नागरिकांना घाबरविण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. याबाबत शहानिशा करून अफवा पसरविणार्यांवर तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा वन विभागाने दिला आहे.
सद्य:स्थितीत बिबट्या दिसल्याचे वा पट्टेरी वाघ रस्त्यावर आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पसरविले जात आहेत. त्या सर्व अफवा असून, अफवा पसरविणार्यांना पकडून सक्त ताकीद दिली आहे. पुढील काळात अशा अफवा पसरविणार्यांवर कारवाई केली जाईल.
– प्रदीप रौंधळ, वन परिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, खेड