चाकण परिसरात चक्क तीन बिबटे; नागरिकांत घबराट

चाकण परिसरात चक्क तीन बिबटे; नागरिकांत घबराट

चाकण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : चाकण शहराजवळील काळूस (ता. खेड) येथील जाचकवस्तीवर एक नव्हे, तर चक्क तीन बिबटे आढळल्याने काळूससह चाकण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाच वेळी एवढे बिबटे आढळून येत असल्याने अनेकांनी पहाटे बाहेर फिरणेच बंद केले आहे.

काळूस येथील जाचकवस्तीवर तीन बिबट्यांचा वावर असल्याचा व्हिडीओ रविवारी (दि. 14 मे) रात्री दहाच्या सुमारास समोर आला आहे. वन खात्याच्या अधिकार्‍यांनी याची पडताळणी केली. खूप मोठे क्षेत्र असल्याने येथे अद्याप पिंजरा लावण्यात आलेला नाही. बिबट्याच्या भीतीने काळूसमध्ये रात्रीपासून रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत होता. वन विभागाकडून या भागात उपाययोजना, जनजागृती करण्यात येत नसल्याची तक्रार काळूसमधील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

जुन्नर, आंबेगावपाठोपाठ बिबट्या आणि खेड तालुका, हे जणू समीकरणच झाले आहे. खेड तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये आणि चक्क शहरालगत असणार्‍या भागात बिबट्याचे दर्शन होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.

मागील काही महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात भिवेगाव, धुवोली भागात दोघांना जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण परिसरात प्रथमच एवढे बिबटे एकत्रितपणे दिसून आल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे.

नागरी वस्तीलगत अधिवास

ऊस हेच आता बिबट्याचे घर बनले आहे. गावाशेजारील कुत्री, वासरू, शेळी, मेंढी, डुक्कर हे भक्ष्य त्याला सहज मिळते. परिणामी, तो अभयारण्यापासून दूर जात आहे. भीमाशंकर अभयारण्य हे बिबट्यांचा अधिवास होता. पण, आता तिथेच बिबट्या दिसून येत नाही. यंदाच्या बुद्धपौर्णिमेला झालेल्या प्राणिगणनेत एकही बिबट्या अभयारण्यात दिसला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news