शिरूरच्या पूर्व भागामध्ये बिबट्यांचा वावर कायम

शिरूरच्या पूर्व भागामध्ये बिबट्यांचा वावर कायम

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूरच्या पूर्व भागामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. मात्र, बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाला अपयश येत आहे. अनेक ठिकाणी दररोज कोठे ना कोठे शेतकर्‍याला बिबट्या दिसून येत आहे. मात्र, त्यामुळे शेतकर्‍यांच्या मनात बिबट्याची दहशत कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागातील बिबट्यांची संख्या कधी कमी होणार? असाही प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

शिरूरचा पूर्व भाग पूर्ण बागायती पट्टा आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी मोठा आडोसा आहे. मांडवगण फराटा, वडगाव रासाई, इनामगाव, तांदळी, पिंपळसुटी, शिरसगाव काटा, बाभूळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, सादलगाव, नागरगाव, कुरुळी आदी परिसरात बिबट्यांचा मोठा वावर आहे. बिबट्यांच्या भीतीने अनेक शेतकर्‍यांना शेळ्या-मेंढ्या विकाव्या लागल्या. वडगाव रासाई आणि इनामगाव या गावांमध्ये बिबट्याने महिलांवर देखील हल्ले केले. नशीब बलवत्तर म्हणून या महिलांना मोठी दुखापत झाली नाही. दिवसेंदिवस या भागातील ऊस कमी होऊ लागला की बिबट्या शेतकर्‍यांना दिसून येत आहे.

ऊसतोडी सुरू असताना अनेक ठिकाणी बिबट्यांचे बछडे सापडले होते. परंतु, वन विभागाने त्यांना सोडून दिल्यामुळे परिसरात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वन विभागाने अनेक पिंजरे लावले. त्यामध्ये फक्त तीन ते चार बिबटे जेरबंद झाले. रात्रीच्या वेळेस शेतावर गेलेले शेतकरी घाबरतच कामे करतात. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे पंचनामे केले. काही शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देखील मिळाली. परंतु, बिबट्याची मनातील भीती तशीच राहिली. अनेक शेतकर्‍यांची पाळीव कुत्री बिबट्यांनी फस्त केली आहेत. त्यामुळे या भागातील बिबट्यांची संख्या कधी कमी होणार? असाही प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेकदा केली. मात्र, अद्यापही वन विभागाने पिंजरे लावलेले नाहीत. बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने उपयोजना करणे गरजेचे आहे.

– समीक्षा फराटे पाटील,
सरपंच, मांडवगण फराटा

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news