

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यालगतच्या वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. शनिवारी (दि. 1) टेकपोळे येथील आंब्याचा दांड धनगरवस्ती जवळील जंगलात ( ता. वेल्हे) सायंकाळी एका धष्टपुष्ट बिबट्याने जनावरांवर हल्ला करून जागीच गाईचा फडशा पाडला.त्यावेळी गंगाराम लक्ष्मण ढेबे या वृद्ध गुराख्याने प्रसंगावधान दाखवत तेथून पळ काढला त्यामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.पानशेत वनविभागाचे वनरक्षक एस. बंगाळ म्हणाले, घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात येणार आहे.
तोरणा घिसर पाठोपाठ पानशेत धरण भागातील रायगड जिल्ह्यालगतच्या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाल्याने गुराखी, शेतकर्यांत दहशत निर्माण झाली आहे. घनदाट जंगलातील दुर्गम भागात घटनास्थळी जाण्यासाठी थेट रस्ते नाहीत. तसेच मोबाईल फोनला रेंजही नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग, वनविभागाला मुख्य रस्त्यापासून पाच ते दहा किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. वेळेवर पंचनामे, शवविच्छेदन तसेच शासकीय कागदपत्रांची पूर्तता करणे शेतकर्यांना गैरसोयीचे होते. त्यामुळे अतिदुर्गम भागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना वनविभागाने शासन निर्णयानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी टेकपोळेचे माजी सरपंच दिनकर बामगुडे यांनी केली आहे.