नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : वामनपट्टा चाळकवाडी( पिंपळवंडी ता.जुन्नर) येथील दत्ताजी बाबाजी वामन यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली. पकडलेला बिबट्या नर असून त्याचे वय सुमारे तीन ते चार वर्षाचे असावे. या भागातील जेरबंद करण्यात आलेला हा सहावा बिबट्या आहे,त्याला माणिक डोह येथील निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. पिंपळवंडी, काळवाडी चाळकवाडी त्याचबरोबर पिंपरी पेंढार, उंब्रज क्रमांक एक, उंब्रज क्रमांक दोन या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या अधिक असून दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा पाळीव प्राण्यावर हल्ला होत असल्याच्या तक्रारी आहेत.
तसेच पिंपळवंडी येथील लेंडेस्थळ या ठिकाणी अश्विनी हुळवळे या 24 वर्षांच्या विवाहित महिलेला बिबट्याने गंभीर जखमी केले होते. त्यानंतर काळवाडी या ठिकाणी रुद्र फापाळे ह्या आठ वर्षाच्या मुलाला बिबट्याने ठार केले होते.तसेच या घटनेनंतर पिंपरी पेंढार येथील बाजरी पिकाचे राखण करणाऱ्या 45 वर्षाच्या नानूबाई कडाळे महिलेला बिबट्याने ठार केले होते. त्यामुळे वनविभागाने
पिंपळवंडी काळवाडी,पिंपरी पेंढार,उंब्रज या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावलेले आहेत. वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक उपवनसंरक्षक अमित भिसे, वनक्षेत्रपाल वैभव काकडे व त्यांचे संपूर्ण पथक व बचाव पथक( रेस्क्यू टीम) त्या परिसरामध्ये तळ ठोकून आहे.
थर्मल ड्रोन कॅमेरा च्या साह्याने उसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्याची पाहणी केली जात आहे. तसेच काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. नागरिकांनी सकाळी नऊच्या आत दुपारी पाचच्या नंतर एकटे बाहेर पडू नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान पिंपळवंडी या ठिकाणी पकडलेला बिबट्या माणिकडोह येथील निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आला असून तो नरभक्षक बिबट्या आहे किंवा कसे याबाबतची सुद्धा खातर जमा केली जाणार आहे.
काळवाडी या ठिकाणी रुद्र फापाळे या आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्यानंतर पकडलेले बिबटे यापुढे सोडून दिले जाणार नाहीत असे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले होते. तसेच पिंपरी पेंढार या ठिकाणी बाजरीचे राखण करणाऱ्या नानीबाई कडाळे या 45 वर्षाच्या महिलेला बिबट्याने ठार केल्यानंतर नरभक्षक बिबट्याला ठार केले जाईल अशी माहिती देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना दिली होती. त्यामुळे पिंपरी पेंढारची घटना झाल्यानंतर पकडलेले बिबट्या नरभक्षक आहेत का? आणि नरभक्षक असेल तर त्यांना गोळ्या घालून ठार करणार का? याबाबतची विचारणा होऊ लागले आहे.
दरम्यान जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या कमी होण्याचे काही नाव घेत नाही.
बोरी 14 नंबर, भोरवाडी, कांदळी वडगाव, येडगाव या भागामध्ये बिबट्यांचा वावर मुक्त पद्धतीने सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिसरात देखील वन खात्याने पिंजरे लावावेत अशी मागणी पुढे येत आहे. तसेच पकडलेले बिबटे कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडून दिले जाऊ नयेत आणि सोडायचे असतीलच तर ते ताडोबा सारख्या जंगलात सोडले जावेत अशी ही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दिवसाही बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करणे अवघड होऊन बसले आहे.
शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी जायला देखील शेतकऱ्यांना आता भीती वाटू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी कांदळी येथे दोन शेतकरी सायंकाळच्या वेळी त्यांच्या शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांच्या पाठीमागे बिबट्या लागला होता परंतु त्यांनी वेळीच पळ काढल्यामुळे वाचलो असे संकेत बढे यांनी सांगितले. दरम्यान वन खात्याने तात्काळ बिबट्यांचे नसबंदी करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच जुन्नर तालुका आपत्ती क्षेत्र म्हणून घोषित करून परिसरातील सगळे बिबटे पकडले जावेत अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा