

वारजे; पुढारी वृत्तसेवा : कोंढवे-धावडे येथील श्रीकृष्णनगरी सोसायटीच्या परिसरात बिबट्यासदृश प्राणी धावत आल्याचे सोमवारी (दि.13) पहाटे गेटवरील सुरक्षारक्षक व पायी जाणार्या एका नागरिकाच्या निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील हा प्राणी दिसून येत आहे. यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
या सोसायटीलगत 'एनडीए'चा परिसर व सीमा भिंत आहे. पहाटेच्या वेळी या सोसायटीच्या गेटमधून बिबट्यासदृश प्राणी सोसायटीच्या आवारात आला आणि दुसर्या दिशेला जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. याबाबत माजी सरपंच नितीन धावडे यांनी वन विभागास माहिती दिली. त्यानंतर वन विभाग बचाव पथकाने (रेस्क्यू टीम) घटनास्थळी जाऊन पाहणी केली केली. संबंधित सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांनी हा प्राणी रानमांजर असल्याचे सांगितले. मात्र, नागरिकांनी तो बिबट्या असल्याचे सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमधील प्राणी बिबट्या असल्यास काळजी घ्यायची, याबाबत परिसरातील रहिवाशांना सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृतीदेखील करण्यात येणार आहे.
वैशाली हाडवळे, वनपाल
बिबट्याचा बछडा सोसायटीच्या आत येऊन तो पुढे 'एनडीए'च्या भिंतीकडे गेल्याचे आम्ही पाहिले. मागील तीन, चार महिन्यांत तो पाच-सहा वेळा या भागात दिसून आला आहे. ते रानमांजर नसून बिबट्याच आहे.
संदीप मनवळ, सुरक्षारक्षक