

पौड; पुढारी वृत्तसेवा : मुळशी धरण भागातील सालतर-तिस्करी येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या बारा वर्षांच्या मुलीवर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला करून जखमी केले. मात्र, हा हल्ला बिबट्याचा वाटत नसल्याचे प्राथमिक मत वनविभागाने व्यक्त केले आहे.
तिस्करी-सालतर येथे शेळ्या चारण्यासाठी एक बारावर्षीय मुलगी गेली होती. तिच्या शेळीवर व तिच्यावर बिबट्याने हल्ला केला. तिने आरडाओरडा करत कोयता हातात घेऊन धावत गेल्यावर बिबट्याने पळ काढला, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मुलीवर उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. एक महिन्यापूर्वी भांबर्डे -तिस्करी परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थ गणेश वाशिवले यांनी केला होता. मात्र, तरुणीवर हल्ला करणा-या प्राण्याने केलेल्या जखमांवरून हा हल्ला बिबट्याने केलेला नाही, असे प्राथमिक मत आहे. पट्टेरी वाघ या परिसरात नाही, असे पौड वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले.