मंचर/महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शिवाई मंदिराजवळ संतोष चिखले यांच्या घरात पुन्हा एकदा बिबट्याने शिरकाव केल्याने चिखले कुटुंबीय बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. सीसीटीव्हीमध्ये बिबट्या फिरताना कैद झाला आहे.
वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करून आमचे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याची मागणी निवृत्त अधिकारी शिवाजीराव चिखले तसेच संतोष कुंडलिक चिखले यांनी केली आहे. (Latest Pune News)
महाळुंगे पडवळ-कळंब रस्त्यावर असणार्या विठ्ठलवाडी येथील शिवाई मंदिराजवळ संतोष कुंडलिक चिखले हे कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या घराच्या बंदिस्त कंपाउंडवर चढून घराच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न बिबट्याने सोमवारी (दि. 9) पहाटे 1 वाजेच्या सुमारास केला.
घराभोवती घिरट्या मारताना, तसेच घराच्या समोरील व आजूबाजूच्या शेतात बिबट्या मनसोक्त फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दरम्यान यापूर्वी देखील चिखले यांच्या घराच्या आवारात बिबट्या येऊन फिरताना आढळला आहे. त्यामुळे चिखले कुटुंबीय भयभीत झाले आहे. वन विभागाने या घटनेची दखल घेऊन तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी विठ्ठलवाडी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.