

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील होनेवाडी येथे सावकार घोडे यांच्या शेतात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 15) घडली आहे. उपासमार झाल्यामुळे मृत्यू घडला असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
घोडे यांच्या शेतात वखारीमध्ये कांदे भरण्याचे काम चालू होते, अचानक शेजारच्या मकेतून बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आल्याने शेतकर्यांनी तिकडे पाहिले असता मकेच्या शेतात बिबट्याचे बछडे साधारणपणे (आठ ते नऊ महिन्यांचे) तिथे खाली झोपलेले दिसले. त्यामुळे काही काळ कांदे भरणारे शेतकरी घाबरून गेले होते. त्यांनी वनविभाग अधिकार्यांना फोनद्वारे ही माहिती दिली.
वनविभागाच्या कर्मचार्यांनी येऊन पाहणी करून त्या बछड्याला उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांचा वावर वाढला असून पशुधनाबरोबरच माणसावरही बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना या दोन महिन्यात घडलेल्या आहेत. शेळ्या, मेंढ्या, वासरे यांच्यावर हल्ले सुरूच असून या भागातील कुर्त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. परंतु हा बछडा अजून शिकारी झाला नसेल त्यामुळेच त्याचा उपासमारीने मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला.