

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतिशील गाव असणार्या खडकवाडी येथील शेतकरी हनुमंत बाळा सुक्रे यांच्या घरालगतच्या गोठ्यावर बुधवारी (दि. 22) मध्यरात्री बारा- एकच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून एक शेळी जखमी झाली आहे. यात सुक्रे यांचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या परिसरात बिबट्या आणि वन्य प्राण्यांसाठी दडण जागा, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने बिबट्याचे या परिसरात नेहमीच वास्तव्य असते. सर्व शेतकरी व पशुपालक यांनी सतर्क राहावे तसेच जनावरांना सुरक्षित जागी निवारा द्यावा असे आवाहन यावेळी वनविभागाच्या अधिकार्यांनी शेतकर्यांना केले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक साईमाला गिते व वनकर्मचारी बाळासाहेब आदक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकर्याला योग्य ती लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके, उपसरपंच एकनाथ सुक्रे, गुलाब वाळुंज, ग्रामसेवक संतोष तुळेकर यांनी वन विभागाकडे केली आहे.