बेल्हे/आळेफाटा; पुढारी वृत्तसेवा : उंचखडक शिवारात बिबट्याने रविवारी रात्री धुमाकूळ घालून पाळीव जनावरांचा फडशा पाडला. बिबट्याच्या हल्लासत्राच्या धुमाकूळाने नागरिकांमध्ये कमालीच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. उंचखडक गावच्या ग्रामस्थांनी याबाबत माहिती दिली. उंचखडक शिवारात दबा धरलेल्या बिबट्याने धोंडीभाऊ कणसे यांच्या गोठ्यातील सहा शेळ्यांवर हल्ला केला. चार जागांवर ठार मारल्यानंतर दोन शेळ्या जबड्यात पकडून बिबट्याने धूम ठोकली.
उंचखडक परिसरात शेतकर्यांची पाळीव जनावरे ठार मारत असल्याने परिसरात बिबट्याचा मोठा उपद्रव होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्याची माहिती आळे वनपाल कार्यालयाला मिळताच वनपाल साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, राजुरी परिसरात तसेच बेल्हे इंदिरानगर, कुकडी वसाहत, दत्तनगर, ढगीमळा, माळीमळा, गारमळा परिसरात शेतकरी कुटुंबांत आणि ग्रामस्थांमध्ये मोकाट जनावरांसह बिबट्याची कमालीची दहशत पसरली आहे.