

आष्टा : पेठ-सांगली या राष्ट्रीय महामार्गावर राज पेट्रोल पंपासमोर शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर झडप घेतल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांसह बिबट्याही गंभीर जखमी झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, पेठ-सांगली या राष्ट्रीय महामार्गावर येथील राज पेट्रोल पंपाजवळ शनिवार, दि. 23 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून निघालेल्या दुचाकीवर बिबट्याने अचानक शेतातून येऊन झडप घेतली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. बिबट्याही जायबंदी झाला. अपघातानंतर बिबट्यासह दुचाकीवरील दोघे गंभीर अवस्थेत बराच वेळ रस्त्यावर पडून होते. यावेळी रस्त्यावरून मोटारीतून निघालेले सामाजिक कार्यकर्ते सागर जगताप यांनी घटनेची माहिती आष्टा ग्रामीण रुग्णालयास दिली.
यादरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढू लागल्यामुळे बिबट्या लंगडत रस्त्यालगतच्या शेतातून पसार झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या आष्टा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठविले.