पुणे : कळंब येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

पुणे : कळंब येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : कळंब येथील सुरजीनाथ मळा येथील शेतकरी उल्हास भालेराव यांच्या बंदिस्त गोठ्यामध्ये सहा फूट भिंतीवरून बिबट्याने आत उडी मारून पाच महिन्यांची कालवड ठार केली. घटनेमध्ये भालेराव यांचे अंदाजे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनपाल शशिकांत मडके यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. घटनेची माहिती कळंब सोसायटी संचालक राहुल भालेराव यांनी दूरध्वनीद्वारे वन विभागाला कळविली.

वन विभागाने उल्हास भालेराव यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य कमलेश वर्पे, सोसायटी संचालक राहुल भालेराव आणि ग्रामपंचायत सदस्या जयश्री भालेराव यांनी केली आहे. वस्तीवर बिबट्याचे रात्री-अपरात्री कधीही दर्शन होत असल्याने वस्तीवरील नागरिक भयभीत झाले आहेत. वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच उषा कानडे आणि उपसरपंच गोकूळ भालेराव यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.

तीन महिन्यांपूर्वी उल्हास भालेराव यांची गाय लम्पी आजारामध्ये दगावली. त्याची मदत शासनाकडून अद्याप मिळालेली नाही. शासनाने घोषित केलेली मदत शेतकर्‍यांना वेळेत मिळणे गरजेचे आहे. वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जनावरांची मदत ताबडतोब शेतकर्‍यांना मिळवून द्यावी.

                                                 उषा कानडे, सरपंच, कळंब

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news