

मंचर: वडगाव काशिंबेग फाटा (ता. आंबेगाव) येथे दुचाकीवरील पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 12) रात्री आठच्या सुमारास घडली. यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
शशिकांत केरभाऊ गायकवाड (वय 48, वाळुंजवाडी, गायकवाडवस्ती, ता. आंबेगाव) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहितीनुसार, शशिकांत गायकवाड यांची पत्नी वैशाली गायकवाड या भीमाशंकर रुग्णालयात काम करतात. (Latest Pune News)
मंगळवारी रात्री शशिकांत हे पत्नीला भीमाशंकर रुग्णालय येथे कामावर सोडवण्यासाठी घेऊन जात होते. त्या वेळी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात दुचाकी घसरून खाली पडली. त्यामुळे गायकवाड पती-पत्नी हेदेखील रस्त्यावर पडले. त्या वेळी बिबट्याने पुन्हा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी बिबट्याच्या दिशेने जोरजोरात दगड फेकून मारले. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. त्या वेळी बिबट्याच्या हल्ल्यात शशिकांत गायकवाड हे जखमी झाले आहेत. त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, वाळुंजवाडी परिसरात बिबट्या आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी अरुण निघोट यांच्या कुत्र्याला बिबट्याने ठार केले. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अंधार असतो. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून जावे लागते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
वाळुंजवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या रस्त्यावर विजेचे खांब लावण्यात आले आहेत. मात्र, सात ते आठ महिने होऊनदेखील या खांबांवर बल्ब लावण्यात आले नाहीत. ग्रामपंचायत प्रशासनाने विजेची सोय करावी. तसेच वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.