

पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवारी (दि. २) दुपारी पावणे चार सुमारास बिबट्याने रोहन विलास बोंबे या १३ वर्षांच्या मुलांवर हल्ला करत ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्याने रोहन याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पिंपरखेड परिसर पुन्हा हादरला आहे.
पिंपरखेड येथे दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास रोहन बोंबे (वय १३) हा घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत होता. यावेळी हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून ऊसाच्या शेतात ओढत नेले. या परिसरात बिबट्याची भिती असल्याने मुलगा दिसत नसल्याचे त्यांच्या आजीने आई-वडिलांना सांगितले. त्यांनी तत्काळ शेजारील लोकांना बोलावून शोध घेतला. तरूणांनी जोराचा आरडाओरड करत जवळच्या ऊसाच्या शेतात शोध सुरू केला. यावेळी त्यांना रोहन मृतावस्थेत मिळाला.
अतिशय ह्रदयद्रावक घडलेल्या या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वनविभागाची गाडी उलटी करत नंतर वाहन पेटवून दिले. २० दिवसांत तिसरी घटना घडली असून या घटनेने पिंपरखेड परिसरातील ग्रामस्थ आक्रमक पवित्र्यात दिसून येत आहे. दोन घटना घडूनही वनविभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुलाचे शवविच्छेदन करू न देण्याचा निर्णय
रोहनच्या मृत्युच्या घटनेने पिंपरखेड ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठोस निर्णय झाल्याशिवाय मुलाचे शवविच्छेदन करू न देण्याचा निर्णय घेतला.
वनविभागाचे वाहन पेटवून ग्रामस्थांनी व्यक्त केला तीव्र संताप
दोन वेळा रास्तारोको आंदोलन करून संवेदना हीन वनविभाग व शासनाला जाग येत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवून तीव्र संताप व्यक्त केला.