

पुणे : लिंबाच्या वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकरी वर्गाकडून लहान तसेच कच्च्या लिंबूची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. बाजारात येत असलेल्या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने तसेच ती कच्ची असल्याने ती खरेदी करण्याकडे खरेदीदारांनी लिंबाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, घाऊक बाजारात लिंबाच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने घसरण झाली आहे. घाऊक बाजारात लिंबाच्या 15 किलोचे भाव 400 ते 700 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, किरकोळ बाजारात वीस रुपयांना चार नग अशी विक्री सुरू आहे.
उन्हाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर कलिंगड मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्याप्रमाणात बाजारात आवक होत नसल्याने त्याच्या भावात किलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे. मृग बहरातील संत्र्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात संत्रीची आवक घटली आहे. परिणामी, त्याच्या भावातही वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांचे भाव स्थिर राहिले आहेत.
रविवारी (दि. 30) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, संत्री 5 ते 6 टन, मोसंबी 25 ते 30 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबांची सुमारे 1 हजार 700 ते 2 हजार 200 गोणी, कलिंगड 30 ते 40 टेम्पो, खरबूज 20 ते 25 टेम्पो, पेरू 600 ते 700 क्रेट्स, चिक्कू दिड ते दोन हजार डाग, अंजीर दोन टन, हापूस आंबा तीन हजार पेटी, कर्नाटक आंब्याची तीस हजार पेटी व बॉक्सची आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 400-700, मोसंबी : (3 डझन) : 260-380, (4 डझन) : 120-250, संत्रा : (10किलो) : 500-1500, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 30-160, गणेश : 10-40, आरक्ता 5-25, कलिंगड : 8-12, खरबूज : 12-18, पपई : 10-22, अननस (एक डझन) : 100-500, पेरू (वीस किलो) : 250-400, चिक्कू (दहा किलो) : 100-500, अंजीर (1 किलो) : 20-100, आंबा : रत्नागिरी हापूस : कच्चा 5 ते 9 डझन : 2500-4500 तयार 3000-5000. कर्नाटक : कच्चा हापूस (1 डझन) 300-500 (1 किलो) 60-80, पायरी (1 डझन) 250-350 (1 किलो) 30-50. लालबाग (1 किलो) 30-40, बदाम/बैगनपल्ली (1 किलो) 30-40.