पुणे : मांडवगण फराटा येथील बंधार्‍याला गळती

पुणे : मांडवगण फराटा येथील बंधार्‍याला गळती

Published on

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील कोल्हापुरी बंधार्‍याला गळती सुरू झाली आहे. गळती त्वरित न थांबवल्यास पिकांना सिंचनासाठी पाण्याचे दुर्भिक्ष होणार आहे. संबंधित विभागाने गळती रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी केली आहे. मांडवगण फराटा येथील भीमा नदीपात्रात तसेच सादलगाव (ता.शिरूर) येथे दोन बंधारे आहेत. दोन्ही बंधार्‍यांवर दरवर्षीप्रमाणे पावसाळा संपल्यानंतर पाणी अडविण्यासाठी ढापे टाकले आहेत. यंदा डिसेंबरपर्यंत पाऊस झाला आहे. त्यामुळे उशिरा ढापे बसवले आहेत. मात्र, सध्या मांडवगण फराटा येथील बंधार्‍यामधून पाण्याची मोठी गळती होऊ लागली आहे.

दिवसेंदिवस उन्हाची तीव—ता वाढत चालली असून, पिकांना पाण्याची अधिक गरज लागते. बंधार्‍यात गळती वाढू लागल्याने लवकरच बंधारा कोरडा होऊ शकतो. परिणामी, गरजेच्या वेळी पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन पिके जळू शकतात, त्यामुळे लवकरात लवकर खराब ढापे बदलावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. दरवर्षी पाण्याची बंधार्‍यातून गळती होत असते. यंदा जूनपर्यंत पाण्याच्या उपलब्ध साठ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. दोन वर्षे शेतकरी अडचणीत होते, त्यात कसेबसे पीक जगविले. यंदा पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे. जनावरांना पाणी व चाराटंचाई निर्माण होऊ नये, म्हणून बंधार्‍यातील गळतीकडे शेतकर्‍यांनी व अधिकार्‍यांनीही लक्ष द्यावे, असे शेतकरी ज्ञानेश्वर फराटे पाटील यांनी सांगितले.

यंदा पाऊस चांगला झाला. पाण्याची गळती लवकर थांबवली नाही तर पाणीसाठा जास्त दिवस टिकू शकत नाही. गळती सुरू राहिली, तर पुढील काही दिवसांत पाणीटंचाई होऊ शकते. पाटबंधारे विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
– संभाजी फराटे इनामदार, संचालक, रावसाहेब दादा पवार घोडगंगा कारखाना.

जलपर्णीमुळे बंधार्‍यात पाण्याचा साठा दिसून येत नाही, त्यामुळे संबंधित विभागच्या अधिकार्‍यांनी होत असलेली गळती त्वरित थांबवावी. तसे न केल्यास शेतकर्‍यांची पिके जळतील. त्वरित संबंधित ठेकेदाराने गळती थांबवावी.
– नवनाथ फराटे, शेतकरी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news