गुणवत्तेत खासगी संस्था अग्रेसर : अशोक गेहलोत

गुणवत्तेत खासगी संस्था अग्रेसर : अशोक गेहलोत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात शिक्षण आणि स्वास्थ्य या दोन विषयांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये खासगी शिक्षणसंस्थासुद्धा अग्रेसर आहेत, असे मत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठाच्या 59 व्या वर्धापनदिन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन गेहलोत यांच्या हस्ते आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑडिटोरियमचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलगुरु डॉ. विवेक सावजी, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील यांचा संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.

गेहलोत म्हणाले, 25 वर्षांपूर्वी मी जेव्हा राजस्थानचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा महाराष्ट्र, पुणे, कर्नाटकमध्ये खासगी शिक्षण संस्थांचे काम पाहिले. त्यांचेच अनुकरण करून त्याची राजस्थानमध्ये सुरुवात केली. आज राजस्थानने शिक्षणात आघाडी घेतलेली आहे. इंग्रजीचे धडे देणार्‍या नवीन 2000 शाळा आणि 302 नवीन महाविद्यालये सुरू केली आहेत. 500 विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे परदेशी शिक्षणासाठी पाठवले जात आहे.

नार्वेकर म्हणाले, भारतात कौशल्यास सर्वाधिक वाव असून, देशाला 'कौशल्य राजधानी' म्हणून ओळखले जाते. येथील सॉफ्टवेअर अभियंते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, जगात भारताचे नाव मोठे करतात. त्यांना भारती विद्यापीठ कौशल्य प्रदान करत असल्यामुळे ते यशस्वी होत आहेत. डॉ. विश्वजित कदम यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news