नेते मतदारांना उमेदवारापर्यंत पोहचूच देत नाहीत; सर्वसामान्यांची दौर्‍याकडे पाठ

नेते मतदारांना उमेदवारापर्यंत पोहचूच देत नाहीत; सर्वसामान्यांची दौर्‍याकडे पाठ

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभेची सध्या रणधुमाळी सुरू आहे. तसेच, प्रत्येक उमेदवाराचे गावभेट दौरेही सुरू झाले आहेत. अनेक नेते मंडळी दिवस उजाडत नाही तोच उमेदवाराच्या प्रचारामध्ये सामील होत आहेत. परंतु, प्रत्येक गावामध्ये असलेल्या काही ना काही अडीअडचणी मात्र नेते मंडळी उमेदवाराला स्पष्ट सांगत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव सर्वसामान्य नेते मंडळीला त्या उमेदवारापर्यंत पोहोचून गावांमध्ये असणा-या अडीअडचणी सांगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये आणि सर्वसामान्य मतदारांची चांगलीच तू तू मैं मैं होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शिरूर लोकसभा सध्या सुरू असून, गावोगावी अनेक प्रश्न प्रलंबित असताना याकडे मात्र नेते मंडळींचे दुर्लक्ष होत आहे. तसेच, निवडणूक जवळ आली की आपल्या उमेदवाराला मतदान करा, निवडून आल्यावर आपण सगळे कामे करू, अशी आश्वासने राजकीय नेते मंडळी देत असून, ते आश्वासने मात्र निवडणूक झाल्यानंतर तसेच प्रलंबित राहतात व पुन्हा निवडून दिलेला प्रतिनिधी गावात येतच नाही, असे देखील या भागामध्ये झाले असल्याचे मतदारांमध्ये बोलले जात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्या गावातील नेते मंडळी कामासाठी आग्रही असतात, त्याच गावात विकासनिधी येतो.

मात्र, इतर गावांना रस्ते, पाणीपुरवठा आदी समस्यांना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागते. अजूनही अनेक भागांत पक्के रस्ते झालेले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे नेते मंडळी दुर्लक्ष करतात व निवडणूक आली की पुन्हा विकासाचे आश्वासन देत आहेत. आजपर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक गावांना उमेदवारांनी भेटून दौरे केले, परंतु या दौर्‍यामध्ये सर्वसामान्य नेते मंडळी दिसून येत नसून, दौर्‍यामध्ये असणार्‍या व्यक्तींची गर्दी व प्रचंड वाहनांचा ताफा सर्वसामान्यांना पाहायला मिळतो. जनतेचे प्रश्न मात्र जैसे थे असतात.

प्रत्येक जण फोटो टाकून दौरा पूर्ण झाला, गावाला भेटी दिल्या व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशा पोस्ट टाकून वाहवा मिळवतात. मात्र, प्रत्यक्षात स्थानिक पाच-सहा नेते सोडले, तर सर्वसामान्य नागरिक या दौर्‍यात दिसून येत नसल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. जो तो आपल्या पक्षाचा व आपल्या उमेदवाराचा उदो उदो करत असून, सोशल मीडियावर देखील एकमेकांना टीका-टिपण्णी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या समस्या लोकप्रतिनिधी कधी जाणून घेणार, पुन्हा ते गावात कधी येणार, आमच्या गावच्या पाण्याची समस्या मोठी आहे, मग या नेत्यांना दिसत नाही का, असा सवाल या भागातील शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news