Pune : तिहार कारागृहानंतर येरवड्यात कैद्यांसाठी कपडे धुलाई यंत्र

Pune : तिहार कारागृहानंतर येरवड्यात कैद्यांसाठी कपडे धुलाई यंत्र

पुणे/येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  नवी दिल्लीतील तिहार कारागृहानंतर येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी कपडे धुलाई यंत्र उपलब्ध करून दिले आहे. नियमित वापरातील कपडे, चादरी, सतरंजी धुलाईसाठी कैदी हे धुलाई यंत्राचा वापर करणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच येरवडा कारागृहात कपडे धुलाई यंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवी दिल्लीतील तिहार कारागृहात कैद्यांना धुलाई यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. तिहारप्रमाणेच येरवडा कारागृहात धुलाई यंत्र खरेदीचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानंतर येरवडा कारागृहात धुलाई यंत्र उपलब्ध करून दिले आहे. सध्या कारागृहात नऊ धुलाई यंत्रे आहेत. धुलाई यंत्रे कार्यान्वित केली आहेत. येरवड्यानंतर राज्यातील अन्य कारागृहांत धुलाई यंत्रे उपलब्ध करून देणार आहेत. राज्यातील अन्य कारागृहांना 193 धुलाई यंत्रे उपलब्ध करून देणार आहेत, असे कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर उपस्थित होते.

कारागृहातील कैद्यांना आरोग्यविषयक मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. कैद्यांना त्वचाविकार होतात. नियमित चादर, सतरंजी, कपडे धुलाई केल्यास संसर्ग टाळणे शक्य होईल. त्यामुळे कारागृहाकडून कपडे धुलाई यंत्रांची खरेदी केली आहे. येरवडा कारागृहात धुलाई यंत्र कार्यान्वित केल्यानंतर राज्यातील अन्य कारागृह प्रशासनाने धुलाई यंत्रांची मागणी केली आहे.

कैद्यांसाठी बायोमेट्रिक सुविधा
कारागृहातील कैदी आणि नातेवाइकांमध्ये संवाद साधण्यासाठी ऑनलाइन मुलाखत सुरू केली आहे. ई-मुलाखत अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅपद्वारे नातेवाईक मुलाखती आरक्षित करू शकतात. कैद्यांसाठी बायोमेट्रिक टच स्क्रीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यंत्राद्वारे कैदी न्यायालयीन खटल्याची माहिती, पुढील सुनावणीची तारीख, संचित रजेच्या अर्जाची माहिती, दूरध्वनी सुविधा याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.

कारागृहातील कैद्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यविषक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कैद्यांमधील त्वचाविकार विचारात घेऊन दैनंदिन वापरातील कपड्यांची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्यासाठी कारागृह प्रशासनाने प्राथमिक टप्प्यात येरवडा कारागृहात नऊ धुलाई यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. टप्प्याटप्प्याने राज्यातील अन्य कारागृहांत धुलाई यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
   – अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलिस महासंचालक, महानिरीक्षक, कारागृह विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news