

Pune Latest Market Update
पुणे: पावसाच्या तडाख्याने टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत आहे. मात्र, यामध्ये पावसाचा मार खाल्लेल्या टोमॅटोचे प्रमाण जवळपास निम्म्यावर पोहचले आहे. पावसाच्या तडाख्याने दर्जात घसरण झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटोचे दर कोसळले आहेत. मध्यंतरीच्या काळात बाजारात बंगळुरूचा टोमॅटो दाखल होत होता.
मात्र, तेथील स्थानिक बाजारपेठांमध्येही टोमॅटोचे दर वाढल्याने तेथील व्यापार्यांनी पुण्यातील बाजारपेठेकडे टोमॅटो पाठविण्यास बंद केल्याचे निरीक्षणही व्यापारीवर्गाकडून नोंदविण्यात आले.स्थानिक गवारीचा हंगाम संपल्याने बाजारात गवारीची आवक घटली आहे. (Latest Pune News)
याखेरीज, स्थानिक कोबी व फ्लॉवरच्या दर्जात घसरण झाली आहे. परराज्यातून बाजारात दाखल होणार्या या फळभाज्यांची दर्जा चांगली आहे. मात्र, त्यांची आवक कमी आहे. शेवग्याच्या हंगाम संपत चालला आहे. सध्या बाजारात परराज्यातील शेवगा चांगला उपलब्ध आहे.
स्थानिक आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी, या सर्व फळभाज्यांच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाड झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांची आवक स्थिर आहे.
बाजारात रविवारी (दि. 29) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 80 ते 90 ट्रक इतकी फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, इंदौर येथून गाजर 9 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, हिमाचल प्रदेश 3 टेम्पो मटार, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी 2 ते 3 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे 9 ते 10 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 40 ते 45 टेम्पो यांचा समावेश आहे.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 500 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 6 ते 7 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेटस, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, भुईमुंग शेंग 100 ते 125 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 75 ते 80 टेम्पो इतकी आवक झाली.
कोथिंबीर, चाकवत, चुका आणि पुदिना महागला
मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मात्र, आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे कोथिंबीर, चाकवत, पुदिना आणि चुक्याच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, केवळ करडईच्या भावात अल्पशी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 29) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, तर मेथीची 20 ते 25 हजार जुडींची आवक झाली होती. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. सर्व पालेभाज्यांचे भाव घाऊक बाजारात 20 रुपयांच्या आत आहेत.