पिंपरी : ऑनलाइन कर भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मिळकतकराचा ऑनलाइन भरणा केल्यास एक जुलै ते 30 सप्टेंबरअखेर सामान्यकरात 4 टक्के सवलत देण्यात येते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. दोन दिवसांत जास्तीत-जास्त मिळकतधारकांनी ऑनलाइन कर भरून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी बुधवारी (दि.28) केले आहे. करसंकलन विभागाने गतवर्षी सव्वासहाशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. यावर्षी 1 हजार कोटींचे टार्गेट ठेवले आहे. त्यानुसार, आर्थिक वर्षातील सहा महिने होत असतानाच आजअखेर 352 कोटींचा कर पालिका तिजोरीत जमा झाला आहे. बिलातील सामान्यकरात विविध वर्गासाठी सवलती लागू आहेत.
मात्र, विविध सवलती 30 जूनपर्यंत लागू होत्या. या सवलतींचा दोन लाख मिळकतधारकांनी लाभ घेतला. मिळकतकराचा ऑनलाइन भरणा वाढावा, ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी करसंकलन विभागाने ऑनलाइन कर भरणार्यांसाठी पुन्हा नव्याने सवलत देण्याचा निर्णय घेतला. एक जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत ऑनलाइन कर भरणार्या मिळकतधारकांसाठी सामान्यकरात 4 टक्के सवलत देण्यात येते. चार टक्के सवलत देण्यासाठी संगणक प्रणालीमध्ये सुधारणाही करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाइनद्वारे कराचा भरणा केला आहे.

