पुणे : आयटीआय प्रवेशाची शेवटची संधी

पुणे : आयटीआय प्रवेशाची शेवटची संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण महासंचालनालय दिल्ली यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी पुरवणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

यापूर्वी अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, प्रवेश अर्जात दुरुस्ती करणे, शुल्क भरणे यासाठी 17 ऑक्टोबरपर्यंत संधी देण्यात आली आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी 18 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.

उमेदवारांना समुपदेशन फेरीसाठी हजर राहण्यास 19 ते 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागा खासगी संस्थांना संस्थास्तरावर भरण्यासाठी 1 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर यादरम्यान मुदत दिली आहे. त्यामुळे खासगी संस्थांमध्ये देखील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

यंदा राज्यात सरकारी आणि खासगी आयटीआय मिळून प्रवेशांसाठी 1 लाख 50 हजार 116 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 1 लाख 33 हजारांहून अधिक प्रवेश झाले आहेत. त्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांवर राज्य मंडळाने जाहीर केलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण विद्यार्थी आणि आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news