

Street Children to Get Education
शिवाजी शिंदे
पुणे: रस्त्यावर फिरणार्या मुलांना समाजाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने ‘मिशन वात्सल्य’ हाती घेतले असून, त्या अंतर्गत 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 31 फिरती पथके सुरू करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2021 मध्ये दिलेल्या आदेशानुसार सहा महानगरपालिका क्षेत्रांत सुरू केलेल्या पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासन व राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने 2021 मध्ये ‘फिरते पथक’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, नागपूर आणि पुणे अशा सहा महानगरपालिका क्षेत्रांत प्रायोगिक तत्त्वावर राबविला. 50 लाखांच्या तुटपुंज्या अर्थसहाय्याने सुरू झालेला हा कार्यक्रम फक्त चारच महिने राबविता आला. (Latest Pune News)
मात्र, या चार महिन्यांत या प्रकल्पाला अत्यंत प्रेरणादायी प्रतिसाद लाभला. या प्रकल्पाद्वारे पाच जिल्ह्यांतील (नाशिक, पुणे, मुंबई शहर, ठाणे आणि नागपूर) 3 हजार 800 हून अधिक मुलांना शैक्षणिक, मनोरंजन, आहार, तसेच आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यात आल्या. त्यामुळे ती मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्याचे निदर्शनास आले.
यातील सर्वाधिक मुले (1679) पुणे जिल्ह्यातील होती. अवघे चारच महिने सुविधा पुरविल्या गेलेल्या या 1679 पैकी 1200 हून अधिक मुले अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत. पथदर्शी प्रकल्पाचे हे यश लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने 31 महानगरपालिका क्षेत्रांसाठी आता 8 कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे.
त्यामुळे राज्यभरातील रस्त्यावर फिरणार्या अनाथ, एकल पालक असणार्या लाखो मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आता शक्य होईल, असा विश्वास महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.
स्वयंसेवी संस्थांची घेणार मदत
या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी महिला व बालविकास विभाग स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार आहे. या संस्थांमार्फत प्रकल्पाला अधिक गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध स्वयंसेवी संस्थांची माहिती घेऊन त्यांचे कार्य बारकाईने पाहिले जात आहे.
असा आहे प्रकल्प...
रस्त्यावर फिरणार्या मुलांची पाहणी करून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी निवड झालेल्या प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात 1 फिरते पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँड, आणि गर्दीच्या ठिकाणी फिरून मुलांची पाहणी करणार आहे आणि त्यांचे समुपदेशन करून वयोगटानुसार त्यांना अंगणवाडी, प्राथमिक शाळा, बालगृह, खुले निवारा गृह येथे शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य ती आरोग्य सुविधा पुरविली जाईल. तसेच त्यांना व्यसनमुक्त करण्यावर भर दिला जाईल. या फिरत्या पथकाला एक व्हॅन दिली जाणार असून, त्यात शिक्षक, शिक्षिका, काळजीवाहक यांचा समावेश असणार आहे.
समुपदेशकाची भूमिका महत्त्वाची
फिरत्या पथकामार्फत रस्त्यावर फिरणार्या शालाबाह्य मुलांमध्ये पुन्हा शिक्षणाविषयीची गोडी निर्माण करण्यात समुपदेशक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. फिरत्या पथकाद्वारे अशा मुलांची निवड झाल्यानंतर महिनाभर त्यांना महिला व बालविकास विभागातर्फेच शिकविण्यात येते.
या काळात विभागातील समुपदेशक त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यात शिक्षणाविषयीची गोडी निर्माण करतात. नंतर त्यांची रूची पाहून त्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला जातो. त्यामुळेच ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहिली आहेत, असे महिला व बालविकास विभागाचे कार्यक्रम व्यवस्थापक योगेश जवांदे यांनी सांगितले.