दिवे : योग्य नियोजन करून अंजीर उत्पादक झाला लखपती

दिवे : योग्य नियोजन करून अंजीर उत्पादक झाला लखपती
Published on
Updated on

नीलेश झेंडे

दिवे(पुरंदर) :  तालुक्यातील दिवे गाव हे फळबागांचे आगार म्हणून अग्रेसर ठरत आहे. येथील असंख्य शेतकरी अंजीर, सीताफळ तसेच पेरूचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. जाधववाडीमधील सुनील जाधव यांनी आपल्या अंजीर बागेमध्ये नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयोगामुळे जाधव हे लखपती झाल्याने त्यांची प्रयोगशील अंजिराची बाग परिसरातील शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सुनील जाधव यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या 24 गुंठे क्षेत्रावर अंजिराची लागवड केली. सुरुवातीलाच जेसीबीच्या साहाय्याने खड्डे घेऊन त्यात शेणखत, बुरशीनाशकाचा वापर करून अंजिराची लागवड केली. लागवडीनंतर दोनच वर्षात प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. सुनील जाधव यांनी कल्पकतेचा वापर केला. जास्तीत जास्त शेणखताचा वापर त्यांनी केला. गरजेप्रमाणे कोंबडी खत, रासायनिक खते वापरली. सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस अशा परिस्थितीत वेळेवर औषध फवारणी करत जाधव यांनी आपली अंजीर
बाग वाचवली.

केवळ 24 गुंठे क्षेत्रावर आत्तापर्यंत तब्बल 12 ते 13 टनांपर्यंत उत्पादन मिळाले असून अजून तोडे सुरू आहेत, असे जाधव यांनी सांगितले. अंजिराची गोडी आणि चमकदारपणामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एका बॉक्समधे एकूण 12 अंजीर अशा 4 बॉक्सची एक पेटी तयार होते. एका पेटीला मुंबई मार्केटमध्ये सर्वोच्च 300 ते 450 रुपये बाजारभाव मिळाला आहे.

घरातील सदस्य करतात मेहनत
गेल्या काही दिवसांमध्ये रासायनिक खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेती करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला जात आहे. त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे आणि अंजिराचा रंग, आकार, चव अप्रतिम आहे. या सर्व कामात जाधव यांना पत्नी सीमा जाधव, आई मंदाकिनी जाधव व मुले मदत करीत आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरचे मजूर घेण्याची आवश्यकता भासत नाही.

वडिलांचा वारसा समर्थपणे जपला
सुनील जाधव यांना आपल्या 81 झाडांपासून आत्तापर्यंत तब्बल 11 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. जाधव यांचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत झाले आहे; मात्र त्यांचे वडील दिवंगत दत्तात्रय जाधव हे अंजीर उत्पादनात नेहमीच अग्रेसर असायचे. त्यामुळे सुनील जाधव यांनी पुढे शिक्षण न घेता वडिलांच्या पाठीमागे शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज एखाद्या बड्या कंपनीच्या कामगारापेक्षा जास्त नफा ते कमवत आहेत.

ही बाग अवघी पाच वर्षांची असून, पुढील वर्षी उत्पादनात वाढ होईल. आमची अंजीर बाग ही परिसरातील शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

                                            – सुनील जाधव, अंजीर उत्पादक शेतकरी, दिवे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news