धानोरी: लोहगाव-वाघोली रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या अडीच महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते, तेव्हापासून या रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणार्या वृक्षांचे पुनर्रोपण आणि छाटणीचे काम संथगतीने चालू आहे.
त्यामुळे रुंदीकरणाच्या कामात अडचणी येत असल्याने वृक्षांच्या पुनर्रोपणाचे काम पूर्ण होणार कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या लोहगाव-वाघोली रस्त्याच्या कामाला गेल्या एप्रिल महिन्यात सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. (Latest Pune News)
संतनगर येथे गेल्या 20 एप्रिल रोजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या जनता दरबारात नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी महापालिकेच्या अधिकारी पौर्णिमा गायकवाड यांनी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे पंधरा दिवसांमध्ये हटविण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, अडीच महिने उलटून गेल्यानंतरही वृक्षांचे पुनर्रोपण काम पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे. लोहगाव स्मशानभूमी परिसरातील अनेक वृक्ष अजूनही पुनर्रोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. तर क्रमांक टाकलेल्या काही वृक्षांच्या छाटणीचे काम अजूनही झालेले नाही. यामुळे रुंदीकरणाच्या कामात अडथळा येत असल्याने नागरिकांतून महापालिका प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
पुनर्रोपणाचे काम लवकरच पूर्ण करणार
रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणार्या 52 वृक्षांपैकी बारा वृक्ष पूर्णतः काढण्यात येणार होते, तर उर्वरित वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार होते. त्यापैकी बहुतांशी काम पूर्ण झाले असून, उरलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील पोपळे यांनी दिली.
अरुंद रस्त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आमदार बापूसाहेब पठारे यांनी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे वृक्ष तातडीने हटविण्याबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या होत्या. प्रशासनाने तातडीने वृक्षांचे पुनर्रोपणाचे काम पूर्ण करून रुंदीकरणाच्या कामातील अडथळा दूर करावा.
- नीलेश पवार, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच ठेकेदारालाही याबाबत वारंवार पत्रे दिली आहेत. येत्या चार दिवसांमध्ये सर्व वृक्ष काढणार असल्याचे ठेकेदाराने सांगितले आहे.
-पौर्णिमा गायकवाड, उपअभियंता, पथ विभाग, महापालिका