

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 18 जानेवारीला जाहीर झाली आहे. मात्र, अद्याप निवडणूक निर्णय अधिकारी पदाचा घोळ कायम आहे. भारतीय निवडणूक आयोगाने करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्या नावाची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषणा केली आहे. तर, पालिकेच्या वतीने उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निर्माण झालेला हा घोळ मिटविण्यासाठी पालिका आयुक्त शेखर सिंह यांची दमछाक सुरू आहे. महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाअभावी हा प्रकार घडला आहे.
चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर होऊन 10 दिवस झाले तरी, अद्याप निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीसंदर्भात आणि तक्रारींचे निरसनाचे कामकाज कासवगतीने सुरू आहे. याबाबत 'निवडणूक निर्णय अधिकार्याचा नाही पत्ता' असे वृत्त 'पुढारी'ने गुरुवारी (दि.26) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकार्यांची घोषणा शुक्रवारी (दि.27) केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करसंकलन विभागाचे सहायक आयुक्ताची नियुक्ती करण्यात आल्याचा अध्यादेश निवडणूक आयोगाने काढला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची गोची झाली आहे.
करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख आहेत. तसेच, त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी ही जबाबदारीही आहे. उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे निवडणुकीचे कामकाज सोपविण्याचा निर्णय आयुक्त सिंह यांनी घेतला आहे. त्यामुळे आयुक्तांनी उपायुक्त ढोले यांना करसंकलन विभागाचे प्रमुख म्हणून अधिकार दिले. निवडणूक अधिकारी म्हणून वर्णी लागणार म्हणून उपायुक्त ढोले यांनी थेरगावच्या 'ग' क्षेत्रीय कार्यालयात निवडणुकीचे कामकाजही सुरू केले आहे.
मात्र, सहायक आयुक्तांच्या नावे ऑर्डर निघाल्याने पालिका प्रशासनाचे गोची झाली आहे. त्यावर आता काय करावे याबाबत आयुक्त सिंह गोंधळून गेले आहेत. करसंकलन विभागात मिळकतकर वसुलीची महत्वाची जबाबदारी सहायक आयुक्त देशमुख यांच्यावर सोपविली आहे. सन 2022-23 हे आर्थिक वर्ष संपण्यास केवळ दोन महिने शिल्लक असून, त्या कालावधीत तब्बल 400 कोटींची वसुली करण्याचे टार्गेट सहायक आयुक्त देशमुख यांच्यावर सोपविण्यात आले आहे. त्यांच्याकडेच निवडणुकीचे कामकाज दिल्यास वसुलीवर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे सोईच्या दृष्टीने उपायुक्त ढोले यांच्याकडे निवडणुकीचे कामकाज सोपविल्याचे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. त्यासाठी ढोले यांना करसंकलन विभागाचे प्रमुख केल्याचा दावा केला जात आहे.
अशी स्थिती असताना, आता निवडणूक आयोगाच्या अध्यादेश बदलण्यास मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने जवळचा पर्याय म्हणून उपायुक्त ढोले यांच्याकडे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त पदाचाही पदभार सोपविला आहे. तसे आदेश आयुक्त सिंह यांनी शुक्रवारी (दि. 27) काढले आहेत. महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्यांमध्ये असलेल्या समन्वयाचा अभावामुळे हा प्रकार घडला आहे. ही तांत्रिक बाब असली तरी, निवडणुकीसारख्या अतीमहत्वाच्या कामकाजाकडे या प्रकारामुळे दुर्लक्ष व दिरंगाई होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.