

पुणे: पुणे महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाकडून मिळकतदारांना दरवर्षी कराची बिले पाठवली जातात. 1 मेपासून करांची बिले नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. मात्र, या बिलांत 40 टक्के कराची सवलत देण्यात आली आहे की नाही, याचा कोठेही उल्लेख नसल्याने मिळकतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
मिळकतकरात 40 टक्के सवलत मिळाली की नाही, याचा स्पष्ट उल्लेख करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, तरी देखील पालिकेच्या कर विभागाने ही बिले देताना त्यात असा कोणताही उल्लेख केला नसल्याचा आरोप सजग नागरिक मंचने केला आहे. (Latest Pune News)
पालिकेने या वर्षातील कराची बिले ही 1 मेपासून नागरिकांना देण्यास सुरुवात केली आहे. तब्बल साडेबारा लाख बिले तयार करण्यात आली आहेत. या बिलांचे वितरण करण्यास देखील सुरुवात करण्यात आली आहे.
मिळकतदारांना राज्य सरकारच्या आदेशानुसार 40 टक्के मिळकतकरात सवलत देण्यासाठी पालिकेने पीटी 3 अर्ज सादर करण्याचे आवाहन मिळकतदारांना केले होते. त्यानुसार अनेकांनी पीटी 3 अर्ज पालिकेला दिले होते. ही सवलत द्यावी की नाही, यावरून संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे पालिकेकडून पाठविण्यात येणार्या बिलामध्ये 40 टक्के सवलतीचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
ही सवलत या वर्षीच्या बिलात दिल्याचा दावा कर विभागाने केला आहे. मात्र, नागरिकांना मिळालेल्या बिलांवर सवलत दिल्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे ही सवलत पालिकेने दिली आहे की नाही, यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सवलत मिळाली की नाही, हे पाहण्यासाठी नागरिकांना पालिकेच्या संगणक प्रणालीमध्ये शोध घ्यावा लागत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र लिहून यावर्षीपासून मिळकतकर बिलात 40 टक्के सवलत देण्यात आली आहे की नाही, हे स्पष्टपणे छापावे, जेणेकरून करदात्या नागरिकांमधील या संबंधीचा संभ्रम संपुष्टात येईल, असे कळवले होते. त्यांनी ही मागणी मान्य देखील केली होती. असे असताना देखील 1 मेपासून पाठवण्यात येणार्या बिलात ते ठळकपणे छापण्यात आले नाही, हे अनाकलनीय व संतापजनक आहे, अशी टीका वेलणकर यांनी केली आहे.
मिळकतदारांना यंदाची बिले पाठवण्यात येत आहेत. ज्या मिळकतदारांना 40 टक्के सवलत दिल्याचा स्पष्ट उल्लेख बिलांवर करण्यात आला आहे. ज्या मिळकतदाराच्या बिलावर असा उल्लेख करण्यात आलेला नाही, ज्यांना ही सवलत मिळालेली नाही, त्यांनी पालिकेकडे पुन्हा अर्ज करावा. अर्धवट कागदपत्रे किंवा इतर काही अटींची पूर्तता न केल्याने त्यांना सवलत मिळालेली नसावी. ज्यांच्या बिलावर 40 टक्के सवलतीचा उल्लेख नाही, त्यांनी पालिकेकडे पीटी 3 अर्ज नव्याने करावा.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका