

पुणे: पाण्याची मागणी वाढल्याने व वडगाव जलशुद्धीकरण केंद्राची पाणी शुद्ध करण्याची अपुरी क्षमता यामुळे दक्षिण पुण्यासह सिंहगड रस्ता, कात्रज व कोंढवा परिसरात पाणी कपात लागू करत दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
या निर्णयावर नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या निर्णयाचा एका आठवड्यानंतर फेर आढावा घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले दिले आहे. पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करून गरज नसल्यास हा निर्णय मागे घेण्याच्या सूचना देखील भोसले यांनी केल्या आहेत. (Latest Pune News)
गेल्या काही महिन्यांपासून वडगाव जलकेंद्रातून कात्रज परिसरात केला जाणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिक पाण्यासाठी ओरड करत होते. त्यातच आता उन्हामुळे पाण्याची मागणी वाढल्याने त्यात आणखी भर पडली आहे.
ज्या भागात कमी पाणी जाते, त्या भागाला पुरेसे पाणी देण्याचे कारण देत या जलकेंद्राचे सात दिवसांचे सात झोन करून त्यानुसार, प्रत्येक एका झोनमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी कपात केली जाणार आहे.
सोमवारपासून (5 मे) हा निर्णय दक्षिण पुण्यात लागू करण्यात आला आहे. महापालिकेच्या पाणी कपातीच्या निर्णयाला नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. हा निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी काही नागरिकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे.
शहराला पुरेसे पाणी मिळत आहे. पाण्याची मागणी वाढली असेल अथवा पुरवठा विस्कळित झाला असल्यास त्यानुसार, प्रशासनाने तो सुरळीत करावा. मात्र, कपात करणे योग्य नाही. त्यामुळे आठवडाभर या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर पुन्हा फेरआढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशा सूचनाही अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त पुणे महापालिका