

इंदापूर: वडापुरी (ता.इंदापूर) येथील दोघांचा सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी टेंभुर्णी रस्त्यावर पिंपळनेरजवळ असलेल्या कालव्यात चार चाकी मोटार पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शंकर उत्तम बंडगर व अनिल हनुमंत जगताप (तोबरे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सुरेश राजाराम जाधव (वय ४९ रा. वडापुरी ता.इंदापूर) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि.२१) रोजी फिर्यादी व त्यांच्या गावातील शंकर उत्तम बंडगर (वय ४४ ) व अनिल हनुमंत जगताप (वय ५५ ) असे तिघे जण चारचाकी मोटारीने धाराशीव येथून वडापुरी (ता.इंदापूर) कडे परतत असताना सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी-टेंभुर्णी मार्गावर पिंपळनेर लगत चालक बंडगर यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन लगतच्या असलेल्या कालव्याला लावलेल्या लोखंडी गार्डला घासून कालव्यात पडली. (Latest Pune News)
त्यावेळी फिर्यादी हे गाडीचा दरवाजा उघडुन गाडीतुन कसेबसे बाहेर आलो आले. यावेळी गाडीचे इतर दरवाजे लॉक झाल्याने इतर दोघांना बाहेर पडणे शक्य झाले नाही.यामध्ये बराच वेळ गेला.
त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरने ओढुन गाडी बाहेर काढली यावेळी गाडीत असलेलं शंकर उत्तम बंडगर, अनिल हनुमंत जगताप यांना कुर्डवाडी येथील दवाखान्यात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे वडापुरी गावावरती शोककळा पसरली असून एकाच गाडीतून प्रवास करत असलेले तिघेही जिवलग मित्र होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला.