

कडूस येथे एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपले दुर्दैवी जीवन संपवले आहे. गणेश दिलीप नेहेरे (वय २१, रा. स्टँडजवळ, कडू, ता. खेड) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या या धक्कादायक कृतीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, जीवन संपवण्यापूर्वी त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘मिस यू किंग गण्या’ असा स्टेटस ठेवला होता, ज्यामुळे या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
गणेश नेहेरे हा कडूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या (दक्षणा फाऊंडेशन) धरणाजवळच्या परिसरातील रूम घेऊन राहत होता. तो या संस्थेत कामगार म्हणून काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (२४ सप्टेंबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तो जेवण करून आपल्या रूममध्ये झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कामावर आला नाही, म्हणून त्याच्यासोबतचा एक कामगार त्याला पाहण्यासाठी गेला. तेव्हा गणेश लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले.
गणेशच्या आईचे तो लहान असतानाच निधन झाले आहे. त्यामुळे, त्याच्या वडिलांसाठी ही घटना खूप वेदनादायी आहे. गणेशच्या या अचानक जाण्याने त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, त्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.