

रत्नागिरी ः काही दिवसांपूर्वी देवरुख येथील सोने व्यावसायिक धनंजय गोपाळ केतकर (63, रा. मार्लेश्वर फाटा, देवरुख ता. संगमेश्वर, रत्नागिरी) यांचे अपहरण करून खंडणीची मागणी करणार्या चार संशयितांच्या मुसक्या बदलापूर आणि पनवेलमधून आवळण्यात पेालिसांना यश आले. त्यांच्याकडून एकूण 6 लाख 75 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
संशयितांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास देवरुख पोलिस करत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यातील दीपक राजेश लोहिरे (37, रा. बदलापूर, ठाणे), विशाल मनोहर आचार्य (45, रा. आपटेवाडी बदलापूर, ठाणे) यांना बदलापूरहून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख 1 लाख 60 हजार रुपये जप्त करण्यात आले तर पनवेल येथून प्रणित संजय दुधाणे (30) आणि राजेश अनंत नवाले (35, दोन्ही रा. भडकंबा पेटवाडी, संगमेश्वर, रत्नागिरी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोबाईल, कार असा 5 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी फिर्यादी धनंजय केतकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, बुधवार 17 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वा ते आपल्या कारने घरी जात होते. त्यावेळी साखरपा ते देवरुख जाणार्या रस्त्यावर वांझोळे गावाजवळ एक पांढरी गाडी त्यांच्या गाडीला घासून पुढे उभी राहिली. त्यातील संशयितांनी केतकर यांना जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून त्यांच्या गळ्यातील 3 चेन आणि रोख 20 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर केतकर यांना एका ठिकाणी नेऊन दुसर्या गाडीत बसवले. गाडीतील 5 संशयितांनी ‘तुला सोडायचे किती पैसे देणार व कुठे देणार’ असे विचारुन 5 लाखांच्या खंडणीची मागणी करत त्यांच्या डोक्यात कठीण वस्तू मारुन दरी टाकून देऊ, अशी धमकी दिली.
दरम्यान, गस्त करणार्या पोलिसांना केतकर हे जखमी अवस्थेत आढळून आल्यावर त्यांनी देवरुख पोलिस ठाण्यात 10 अज्ञातांविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरुन देवरुख पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास देवरुख पोलिस ठाणे येथून सुरु असताना पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी लागलीच गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी पथके रवाना करण्याबाबत सूचना दिल्या. अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनीही घटनास्थळी भेट देउन तपासाबाबत मार्गदर्शन करत संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना होती.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. महामुनी, लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, देवरुख पोलिस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे तसेच पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर, सहाय्यक पोलिस फौजदार पांडुरंग गोरे, सुभाष भागणे, पोलिस हवालदार नितीन डोमणे, विनायक राजवैध,विक्रम पाटील, गणेश सावंत,योगेश नार्वेकर,प्रविण खांबे,विवेक रसाळ,योगेश शेट्ये,रमिज शेख,शांताराम झोरे,बाळू पालकर,विजय आंबेकर,सत्यजित दरेकर,दिपराज पाटील,अमित कदम,भैरवनाथ सवाईराम,विनोद कदम, पोलिस शिपाई अतुल कांबळे, महिला पोलिस काँस्टेबल शितर पिंजरे, चालक पोलिस नाईक दत्ता कांबळे आणि नीलेश शेलार यांनी केली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी लागलीच गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी सहा तपास पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पनवेल, बेलापूर येथे रवाना केली होती. तांत्रिक तपासातून आतापर्यंत 4 संशयितांना ताब्यात घेतले असून संशयितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बगाटे यांनी सांगितले.