

पुणे : डावी भुसारी कॉलनीतील श्री सुवर्ण सोसायटीत घरफोडीच्या प्रयत्नादरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर पिस्तूल दाखविणाऱ्या दोन चोरट्यांच्या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी ते पिस्तूल नव्हे, लायटरसदृश वस्तू आहे, असा दावा केला होता. मात्र, कोथरूड पोलिसांचा दावा खोटा ठरला आहे. कारण, हडपसर पोलिसांच्या एका कारवाईनंतर सीसीटीव्हीत दिसलेली ती वस्तू लायटर नव्हे, तर पिस्तूलच असल्याचे आता समोर आले आहे. (Latest Pune News)
हडपसर पोलिसांनी या दोन चोरट्यांना वाहन चोरीप्रकरणी पकडले असता त्यांच्या ताब्यातून तेच देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या या घरफोडीच्या प्रयत्नात चोरट्यांनी पोलिसांना कॅमेऱ्यासमोरच उघड आव्हान दिले होते; पण काही तासांतच कोथरूड पोलिसांनी माध्यमांना पिस्तूल नव्हे, लायटर आहे, असे सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गंभीर गुन्ह्याला हलक्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले.
वाहनचोरीच्या घटनेनंतर सहा दिवसांतच हडपसर पोलिसांनी गस्तीच्या वेळी दोन 17 वर्षीय मुलांना वाहन चोरीप्रकरणी पकडले आणि त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस सापडले. तपासात उघड झाले की, ही तीच मुले कोथरूडमधील पिस्तूल सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या घटनेत सामील होती. महत्त्वाचे म्हणजे कॅमेऱ्यात दिसलेले तेच पिस्तूल त्यांच्या ताब्यात आढळले. त्यामुळे कोथरूड पोलिसांचा दावा फसला अन् ते खोटे पिस्तूल खरे निघाले. ताब्यात घेतलेल्या या दोघांकडून तब्बल आठ वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. या उघडकीनंतर कोथरूड पोलिसांचा लायटर दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे.
चोरट्यांनी आपल्या हातात पिस्तूल घेऊन कोथरूड येथील सोसायटीत प्रवेश केला होता. सोसायटीतून बाहेर पडताना त्यांनी तेथील सीसीटीव्हीत पिस्तूल दाखवत पोलिसांना आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, जेव्हा याबाबत विचारणा झाली तेव्हा स्थानिक पोलिसांनी ते आव्हान हलक्यात घेतल्याचे पीहायला मिळाले. कॅमेऱ्यात दाखवलेली वस्तू पिस्तूल नसून ते लायटर असल्याचे त्यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे चोरट्यांनी स्थानिक पोलिसांना आव्हान दिल्यानंतरही स्थानिक पोलिस बघ्याच्या भूमिकेतच असल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्त त्यांची गंभीर गुन्ह्यांवर पांघरुण घालण्याची प्रवृत्तीही उघड झाली आहे, अशी चर्चा शहरात होताना दिसत आहे.