राहू(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भिवर येथील परिसरामध्ये बिबट्याने मंगळवारी माजी उपसरपंच गुलाब लंवगे यांची बंदीस्त गोठ्यातील शेळी बुधवारी (दि. 11) मध्यरात्री फस्त केली. बेट परिसरामध्ये रोजे रात्री बिबट्याचे दर्शन होत असून, बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील इतर शेतकरी भयभीत झाले आहेत.
बिबट्याने हल्ला केल्यामुळे अनेक जणांना आपला जीव गमावावा लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, अनेक जण गंभीर झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात बिबट्याबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहू बेट परिसरामध्ये मागील महिन्यात माधवनगर येथे एका शेळीचा फडशा पाडला होता. दहिटणे येथेही बिबट्याचा वावर असल्याची माहिती पोलीस पाटील नवनाथ धुमाळ यांनी दिली.
या परिसरामध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असून, वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी कोरेगाव भिवरचे सरपंच चिंतामण मस्के, उपसरपंच भारत वर्पे, सोमनाथ काळे, मधुकर सोनवणे, रवींद्र शिंदे, अशोक वर्पे, ग्रामसेविका रोहिणी नंदाले आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.