

पुणे: फळांचा राजा असलेल्या कोकणातील हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याने मार्केट यार्डातील फळबाजारात हापूस आंब्याची आवक घटू लागली आहे. लहरी हवामानामुळे यंदा हंगाम लवकर आटोपता घेत असल्याने पुढील आठ ते दहा दिवस आंब्याची चव चाखता येणार आहे. सद्य:स्थितीत बाजारात 400 ते 800 रुपये डझन या दराने हापूस आंबा उपलब्ध आहे.
लहरी हवामानामुळे मोहोर गळाल्याने हंगामाच्या सुरुवातीलाही या आंब्याची आवक कमी होत होती. त्यामुळे गुढीपाडव्याला या आंब्याचे भाव चढेच होते. डझनाला 1 हजार ते 1800 रुपये मोजावे लागत होते. (latest pune news)
मात्र, अक्षयतृतीयेला आवक वाढल्यामुळे भाव आटोक्यात आले होते. आता तेच आहेत. डझनाला दर्जानुसार 400 ते 800 रुपये मोजावे लागत आहेत, तर दुसरीकडे कर्नाटक हापूसलाही हवामानबदलाचा फटका बसला आहे. यंदा महिनाभर विलंबाने आवक वाढली आहे.
सद्य:स्थितीत कर्नाटक हापूसचा हंगाम बहरला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक दुप्पट होत आहे. त्यामुळे खवय्यांनी आता कर्नाटक हापूसकडे आपला मोर्चा वळविला आहे. दि. 15 जूनपर्यंत कर्नाटक हापूसची आवक सुरू राहणार आहे. रविवारी (दि. 3) लाकडाच्या 5 ते 7 डझनाच्या सुमारे 7 हजार पेटी, तर 2 डझनाच्या 20 हजार बॉक्सची आवक झाली. 4 ते 6 डझनाच्या पेटीला 1 हजार ते 1 हजार 500 रुपये भाव मिळत आहे.
कोकणातील हापूसची आवक घटली आहे. मागील आठवड्यात 5 हजार पेट्यांची होणारी आवक आता अडीच ते 3 हजार पेटीपर्यंतच होत आहे. नेहमीच्या तुलनेत 15 ते 20 आधीच हंगाम संपणार आहे.
- युवराज काची, कोकण हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड
कोकणातील हापूसची आवक घटून दरवाढ झाल्याने नागरिक कर्नाटक हापूस खाण्यास पसंती देत आहेत. कोकणातील हापूसचा हंगाम आटोपल्यास कर्नाटक हापूसच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
- रोहन उरसळ, कर्नाटक हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड