कोंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कोंढवा गावठाण रस्त्यावर दररोज होणार्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त होत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. तसेच, बायपास रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून कुमारपृथ्वी सोसायटीपासून लुल्लानगरकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे काळाची गरज आहे. या उपाययोजना होणार तरी कधी? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कोंढवा खुर्द गावठाणमधील रस्तारुंदीकरण रखडल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. इतरत्र दोन्ही बाजूंनी रुंद्दीकरण झाले आहे. त्या ठिकाणी देखील अतिक्रमणे झाल्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता अरुंद झाला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. उंड्री, पिसोळी, सासवड आणि कात्रजकडून येणार्या वाहनांची वर्दळ या ठिकाणी नेहमी असते. या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र, तरीसुद्धा अवजड वाहनांची या रस्त्यावर वर्दळ दिसून येत आहे. यामुळे या ठिकाणी वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या रस्त्यावर मीनाताई ठाकरे हॉस्पिटल, इंग्रजी माध्यमाची शाळा, ई-लर्निंग स्कूल आणि मनपाची संत गाडगे महाराज शाळा आहे. तसेच पीएमपीचा बसथांबाही आहे. दोन बस समोरासमोर आल्या, तर त्या पास करताना चालकांना कसरत करावी लागत आहे. कुमारपृथ्वी सोसायटी ते लुल्लानगरकडे जाणार डीपी रस्ता विकसित झाला, तर कोंढव्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल.
तसेच कोंढवा बायपास मार्गावरील अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने नियमितपणे कारवाई करावी. यामुळे कौसरबाग परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच, गावठाणातील रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास वाहतुकीसह इतर प्रश्न मार्गी लागतील. यामुळे या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोंढवा गावठाण रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय हा महापालिकेच्या मुख्य खात्यांतर्गत येतो. तो क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत नाही. वरिष्ठ आधिकार्यांकडून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.
– श्याम तारू, सहायक आयुक्त, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय
कोंढवा गावठाण रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने या मार्गाचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. सकाळी व सायंकाळी होणार्या वाहतूक कोंडीमुळे पादचार्यांना रस्ता ओलांडणे कठीण होत आहे.
– तानाजी लोणकर, रहिवासी, कोंढवा