

Kirit Somaiya on loudspeaker removal
पुणे: मुंबईतील मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मशिदी, मदरशांवरील अनधिकृत भोंगे, लाउडस्पीकर ताबडतोब काढण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली.
सोमय्या यांनी रविवारी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना भेटून निवेदन दिले. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Latest Pune News)
सोमय्या म्हणाले, मुंबई उच्च न्यायालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंगेमुक्त महाराष्ट्राचा आदेश दिला आहे. पुणे पोलिस आयुक्तांना आणि शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना विनंतीपत्र पाठवले आहे. तसेच न्यायालयाचा आदेश आणि मुंबई पोलिसांनी शहर कसे भोंगेमुक्त केले, याची कागदपत्रेही दिली आहेत.
फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत 14 मशिदी असून, त्यापैकी एकाही मशिदीवरील भोंग्याविरुद्ध एकदाही कारवाई झालेली नाही. भोंगा आणि स्पीकरमध्ये फरक आहे. भोंगा कायद्याने प्रतिबंधित आहे. मशीद किंवा कुठल्याही उत्सवासाठी कायमस्वरूपी स्पीकर लावायचा असेल, तर दहा बाय पंधरा इंचाचा स्पीकर लावावा लागतो.
या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी झाली असून, त्याची कागदपत्रे त्यांनी फरासखाना पोलिसांना दिली आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकही मशीद नाही, असेही त्यांनी सांगितले. मुंबई पोलिस आयुक्तांप्रमाणेच पुण्याचे पोलिस आयुक्तही शहर भोंगेमुक्त करून दाखवतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
डीजेमुक्त गणेशोत्सवाकडे जावे लागणार!
ध्वनिप्रदूषण कायदा 2002 पासून लागू झाला. ही सामाजिक सुधारणा आहे. टप्प्याटप्प्याने हा कायदा लागू करण्यात आला. अनेक मंदिरांवरील भोंगे उतरवण्यात आल्याचे दिसले. त्यासोबतच गणेशोत्सव डीजे मुक्त करून ध्वनिप्रदूषण कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने आपल्याला जावे लागणार आहे.
निवेदनातील मुद्दे
जानेवारी 2025 मध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय आला असून, मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात ध्वनीची मर्यादा 50 डेसिबलपेक्षा अधिक नसावी, असे स्पष्ट निर्देश आहेत.
फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मशीद आणि मदरशांवर परवानगी न घेता भोंगे वाजवले जातात.
भोंगे बेकायदेशीर आहेत, हे माहीत असूनही पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत.
उंचीवरील भोंग्याचे डेसिबल मोजमाप पोलिस जमिनीवरून घेतात, जे चुकीचे आहे. कारण अशा प्रकारे ध्वनिवर्धकाचे योग्य माप घेता येणे शक्य नाही.
मदरसा आणि मशिदींवरील सर्व अनधिकृत भोंगे त्वरित काढण्यात यावेत.