

16,000 complaints received by Indian Railways
पुणे: भारतीय रेल्वेच्या पुणे विभागात ‘रेल मदद’ (रेल्वेची हेल्पलाइन - 139 क्रमांक) ही तक्रार निवारण प्रणाली प्रवाशांसाठी मोठा आधार ठरत आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल 16 हजार 835 प्रवाशांनी या हेल्पलाइनची मदत घेतली असून, प्रशासनाने बहुसंख्य तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे.
रेल्वे प्रवासी सुरक्षा याबाबत प्रवासी अधिक चिंतीत असल्याचे या तक्रारींवरून निदर्शनास आले असून, या कालावधीत पावणेचार हजार प्रवाशांनी सुरक्षेबाबतच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रारींमध्ये विद्युत उपकरणांबाबतच्या तक्रारींचे प्रमाणही मोठे असून, थोड्या थोडक्या नव्हे तर 3 हजार 727 प्रवाशांनी रेल्वेतील विद्युत उपकरणे (दिवे, पंखे) बाबत प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Pune News)
रेल्वे प्रशासनाकडील आकडेवारीनुसार, दि. 1 एप्रिल ते 28 जुलै 2025 या चार महिन्यांच्या कालावधीत या हेल्पलाईनवर (दूरध्वनी क्रमांक-139) तब्बल 16 हजार 835 तक्रारींची नोंद झाली आहे.
प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यात आणि त्यांना तातडीने मदत करण्यात ‘रेल मदद’ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे रेल्वेचे पुणे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहेरा यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
कोच स्वच्छतेबाबत प्रवाशांची नाराजी
रेल्वेच्या कोच स्वच्छतेबाबतही प्रवाशांनी या हेल्पलाईनवर नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये डबे अस्वच्छ - 1 हजार 612, बेड रोल असमाधानकार - 1 हजार 547, पाण्याची अनुपलब्धता - 1 हजार 308 आणि गाडीची विलंबाबत - 1 हजार 418 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
‘रेल मदद’ हेल्पलाइन ठरतेय वरदान
‘रेल मदद’ची उपयुक्तता फक्त तक्रारींपुरती मर्यादित नसून, आपत्कालीन परिस्थितीतही ती जीवन वाचवणारी प्रणाली ठरली आहे. त्याबद्दल बोलताना बेहेरा यांनी हुबळी-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (ट्रेन क्र.20657) या गाडीचे उदाहरण दिले. या गाडीतून प्रवास करणार्या एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या.
त्याबाबतची तक्रार ’रेल मदद’ हेल्पलाईनवर आली आणि रेल्वेच्या टीमने तात्काळ रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि वैद्यकीय कर्मचार्यांच्या सहकार्याने तिला मदत पोहोचवली. परिणामी, गाडीतच या महिलेचे बाळंतपण सुखरूप पार पडले.