चाकूचा धाक दाखविणे आले अंगलट ! चाकू दाखविणार्‍याचाच खून

चाकूचा धाक दाखविणे आले अंगलट ! चाकू दाखविणार्‍याचाच खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रागात पाहून शिवीगाळ केल्यानंतर त्याची विचारणा केली असता तसेच त्याने त्याच्याकडील चाकू काढून घाबरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाकूचा धाक दाखविणे त्याच्याच अंगलट येऊन आरोपीने तोच चाकू त्याच्या पोटात खुपसला. त्याला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात नेण्यात आले. आरोपीने केलेल्या हल्ल्यात त्याच्या किडनीला जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे यांनी सांगितले.

अहमद रजा खान (वय 21, रा. जार्कजवळ, कोंढवा खुर्द) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला सलीम इब्राहिम खान (वय 49, रा. नवाजीश चौक, कोंढवा) हा देखील झटापटीत जखमी झाला असून, त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. याबाबत सलमान खान (वय 23, रा. जे. के. पार्क, कोंढवा खुर्द) याने फिर्याद दिली. हा प्रकार 25 एप्रिल रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि त्याचा भाऊ मंगळवारी सकाळी कोंढव्यातून चालत चालले असताना त्यांचा ओळखीचा सलीम खान याने फिर्यादीचा भाऊ अहमदकडे रागाने पाहिले तसेच शिवीगाळ केली. म्हणून अहमदने याची विचारणा करीत त्याच्याजवळ असलेल्या चाकू काढत सलीमला घाबरविण्याचा प्रयत्न केला. याच वेळी सलीमने अहमदकडील चाकू हिसकावून घेत तोच चाकू अहमदच्या पोटात खुपसला. या झटापटीत सलीमही जखमी झाला. अहमदला जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने व मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सध्या खून करणार्‍या सलीमला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांच्या देखरेखीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दोन दिवसांपूर्वीच आरोपी कारागृहातून बाहेर
दोन दिवसांपूर्वी आईवरून शिव्या दिल्याच्या रागातून ज्येष्ठ नागरिक असलेल्या मित्राचा डोक्यात फरशीने मारून खून केल्याचा प्रकार पिसोळी येथे घडला. मुद्दीन तायरभाई बारोट (वय 62, रा. पिसोळी ग्रामपंचायतीमागे, पिसोळी) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी महेश महादेव ओव्हाळ (वय 32, रा. सिध्दार्थनगर, पिसोळी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील अशाच पध्दतीने खून केला होता. त्या गुन्ह्यात ओव्हाळ नुकताच कारागृहाबाहेर आला होता. पहिल्या खुनाच्या प्रकारात दारूच्या नशेतच खून करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news