पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर येथील सराईत गुन्हेगाराचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. गोट्या ऊर्फ अविनाश लक्ष्मण पांढरे (20, रा. हडपसर, पुणे) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्याचा मित्र रोहित पवार (20, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
अविनाश पांढरे यांच्यावर चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील तीन गुन्हे हे हडपसर पोलिस ठाण्यातील असून, त्यामध्ये हत्यार बाळगणे, खुनाचा प्रयत्न, खून अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर, वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर तडीपारीची कारवाई होऊनदेखील तो शहरात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवारी पहाटे फिर्यादी व त्याचा मित्र अविनाश पांढरे गावी जाण्यासाठी रविदर्शन बसस्टॉप येथील लक्झरी बसमध्ये बसले होते. या वेळी बसमधील प्रवाशांची व खाली थांबलेल्या नागरिकांची भांडणे सुरू होती. या ठिकाणी भांडणे सुरू असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस ती भांडणे सोडवण्यासाठी रविदर्शन येथे आल.
पोलिस आल्याची चाहूल लागताच व पोलिस आपल्यालाच पकडायला आले, असा समज करून पांढरे याने लक्झरी बसच्या खिडकीमधून उडी मारली. या वेळी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याने डिव्हायडरवरून पलीकडे उडी मारली. त्यावेळी त्याला कारची धडक बसली. यात त्याचा मृत्यू झाला.