शिरूर; पुढारी वृत्तसेवा: येथील मुंबई बाजार येथे घराबाहेर शतपावली करणार्या तरुणाचे रिक्षामधून आलेल्या तरुणांनी मारहाण करीत अपहरण केले. या वेळी टोळीसाठी दहा लाख रुपयाची खंडणी मागून त्याच्यावर शिरूर दशक्रिया घाटाजवळ जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात 11 जणांसह दोन अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादीच्या मामाचे याअगोदर अशाच प्रकारे याच आरोपींनी अपहरण करून पाच लाखांची खंडणी उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना गुरुवारी (दि. 15) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अभिषेक ईश्वर गंगावणे (रा. मुंबई बाजार शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विशाल काळे, उमेश जगदाळे, अविष्कार लाडे, अक्षय परदेशी, कैलास ननवरे, देवानंद चव्हाण, हर्षल काळे, रूपेश लुनिया, अमोल लुनिया, दादा खिलारी (पूर्ण नाव माहिती नाही) व गोपाल यादव (सर्व रा. शिरूर) व दोन अनोळखी इसम यांच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी अभिषेक हा जेवण झाल्यानंतर घरासमोर मित्राबरोबर शतपावली करत असताना अचानक त्याच्या जवळ सहा सीटर रिक्षा येऊन थांबली. त्यात विशाल काळे, उमेश जगदाळे, अविष्कार लांडे, अक्षय परदेशी हे तलवार, कोयता, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड घेऊन बसले होते. या तरुणांनी फिर्यादीस मारहाण करून रिक्षात बसवून दशक्रिया घाटाजवळ आणले व तेथे 10 लाख रुपयाची खंडणी मागितली.
तेथे एका चारचाकी गाडीत आणखी तरुण होते. तेथे या सर्वांनी दहशत निर्माण करत उमेश जगदाळे, रुपेश लुनिया यांनी लोंखडी रॉडने, देवानंद चव्हाण, हर्षल काळे व कैलास ननवरे यांनी फिर्यादीस हॉकी स्टीकने आणि इतर आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान फिर्यादीचे दोन मित्र तेथे आले व त्यांनी फिर्यादीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तक्रारीनंतर या घटनेचा तपास शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.